फिरत होतो रस्त्यावर औषधांचा बाजार मांडुन एकदा, आता आवरायचं आणि निघायचं!
तेव्हढ्यात धप्पकन कोणीतरी काहीतरी माझ्याशेजारी आदळल्याचा आवाज आला. चमकुन बघीतलं तर एक टोपली होती आणि टोपलीत एक देवी, हळदी कुंकु, फुलं आणखीही बरंच काही…
टोपली ठेवल्यानंतर लगोलग एक आज्जी बसली, टोपलीला पुढ्यात घेवुन. आज्जीचा थाट भारी होता, हातात बांगड्या, गळ्यात जुन्या काळचं मंगळसुत्र, कानात आणि नाकात ठसठशीत दागिना! डोळ्यात वेगळीच चमक, चेहरा उन्हानं काळवंडलेला पण डोळ्यातली लकाकी लपत नव्हती…
मी बघतच राहिलो, ही आज्जी आणि भीक? का बरं असेल?
“डाक्टर हाइसा न्हवं?”
खणखणीत आणि तो-यात विचारलेल्या प्रश्नानं माझी तंद्री भंगली.
“होय आज्जी.”
“आमास्नी औशीद मिळंल न्हवं?” गुरगुरावं तसं मला विचारलं.
तोरा तोच, रुबाब तोच. आवाजात कुठ्ठही मार्दवता नाही!
मी म्हटलं, “हो देईन की, बोला काय त्रास आहे?”
“आता डाक्टर तुमी का मी? वळका की. म्हातार माणसाला काय तरास आस्तो?”
बोलणं अस्सल कोल्हापुरी ढंगाचं!
म्हटलं, “मावशी कोडी नका घालु, तुमचा त्रास सांगा.”
“गुडगं गेल्यात कामातनं, औशीद आसंल तर द्या, न्हायतर जावुंद्या मला.”
बोलण्यात आविर्भाव असा, जणु काही मीच तीचा खोळंबा केला होता!
औषध देत म्हटलं, “मावशी, कोल्हापूरची का तु?”
“व्हय, तुमी कसं वळकलं?”
आवाज तोच, जरब तीच, अस्सल गावरानी कोल्हापुरी…
“असंच”, हसत म्हटलं.
उठण्यासाठी टोपलीला हात लावला तीनं आणि सहज बोलुन गेलो, “मावशी, लोकं चार चार तास लायनीत उभं राहुन देवाचं दर्शन घेतात, तुम्ही तर देवच डोक्यावर घेवुन फिरताय… तुम्हाला लायनीत उभं राहुन दर्शन घ्यायची गरजच नसेल पडत!”
“का बरं कोण म्हणलं”? उसळत म्हणाली. “आवो नवस हाय ह्यो माजा”
बोलण्यातला तिखटपणा जाणवत होताच…
आता माझीही उत्सुकता ताणली गेली. म्हटलं “मावशे, बस की, पाणी पिवुन जा.”
बसु का नको विचार करत, बसली बाटलीतलं थंड पाणी प्यायली.
हळुच विचारलं, “मावशे नवस कसला गं?”
“हाय कसला तरी, जळुदे तीकडं…” असं म्हणुन तोंड फिरवलं.
शब्दातली धार अजुन वाढली आणि कडवटपणाही.
मग मी माझा पवित्रा बदलला, “आगं सांग की मावशे, मी तुज्या लेकावानीच हाय आन कोलापुरचाच हाय. मला सांगणार न्हाइस व्हंय?”
हि मात्रा लागु पडली असावी. अविश्वासाने आधी निरखुन पाहिलं माझ्याकडे. पुन्हा तोंड तिसरीकडे फिरवलं आणि फाट्कन माझ्याकडे तोंड फिरवत मोठ्या आवाजात बोलली, “सासु सुनाची काय भांडणं व्हयीत न्हाईत का? व्हय? बोला की!”
क्षणभर वाटलं ही चवताळलेली वाघीण मलाच तीची सुन समजत्येय का काय? नाहितरी ती आल्यापासुन मी पण शेळीच झालो होतो.
खाली मानेनं मी म्हणालो, “हो, होतात की…”
“मंग?”
मी हिय्या केला म्हणालो “मावशे, नीट सांग, तु काय बोलतीयास मलाच काय कळंना”
आता ती वाघीण टेकुन व्यवस्थित विसावली आणि बोलायला लागली. “माजा दादला कोलापुरच्या मुन्शीपाल्टीत कचरा गोळा करायच्या कामावर हुता. येकुलतं येक पोरगं. दादला मेला तवा पोराला आनुकंपा म्हणुन बा च्या जाग्याव घेतला कामाला. न्हव-याच्या हातात कारबार हुता तवर समदं येवस्तीशीर हुतं. पण पोरगं लागलं कामाला आन तीतनं सम्दं बीगाडलं. तमाशाचा नाद लागला, म्हनलं आसु दे, मरदगडी हाय त्येनं न्हायतर कुनी बगायचा तमाशा?”
“पन हित्तंच चुकलं माजं डाक्टर . मीच xxxx हाय, माजी xxxxx…”
आज्जीनं स्वतःलाच शिव्यांची लाखोली वाहीली.
“पुना तमाशानंतर दारु आली आन त्याच नशेत नाचणा-या बाईला एक दिवस सुन म्हणुन घरी आणली. बाई दिसायला बरी हुती, म्या म्हनलं आसुंदे हिज्या नादानं पोरगं माजं सुदरल तरी! पन न्हाई, नवरा कामावर गेला की ही बी भाईर. मंग बोलु का नको तीला?” आज्जीचा स्वर इथं टिपेला.
“व्हयाची मंग आमची भांडणं आन मारामा-या. माजं काय चुकत आसंल तर पायताणानं मारा मला.”
मी काय बोलणार ???
“फुडं त्यानला बी एक लेकरु झालं. लय ग्वाड माजा नातु.”
हे बोलतानाचा एवढ्या वेळात पहिल्यांदाच खाली आलेला, पडलेला, कातर आवाज मला जाणवला. नातवाचं नाव घेतल्यावर वाघीणीची मांजर झालेली मला जाणवली.
“चींगम लय आवडायचं त्येला. म्याच सवय लावली हुती. आसं येवडालं फुगं करायचं माजं लेकरु तोंडानं आणी माज्या तोंडाजवळ यीवुन फाटदिशी फोडायचं! म्या हासलो की त्येला लय गंमत वाटायची.”
आज्जीचा पदर डोळ्याला… बोलतानाचे हुंदके आणि आवंढे तीला बोलुच देत नव्हते…
“येक दिस आला माजा ल्योक, आन म्हनला, मी नोकरी सोडलीया आन बायकुला घीवुन पुन्याला चाललुय , तीतं एका फडावर हिला काम मिळलंय, पैसं लई मिळत्याल. तु -हा हितंच, न्हायतरी तुमच्या दोगीच्या कलागतीला मी बी कावलोय आता!”
“आरं, आरं” म्हणुस्तवर गेला बी…
येक दिस दोगंबी आली पोराला घीवुन, म्हणली “आमी चाललुया आज सांजच्याला, तु बग आता तुजं.”
सुनंच्या पाया पडले, म्हणलं “बायो, जावु नगंस, तुला काय करायचं हाय ते कर, मी तुला बोलणार न्हायी… मला म्हागं सोडु नगासा, मी बी येतो. मी हंबारडा फोडला पण तीला न्हाई पाजर फुटला डाक्टर.”
म्हणलं “तुमी दोगं जा, नातवाला तरी माज्याजवळ -हावु दे, माजी सवय हाय त्येला. माज्या हातचं चींगम लागतंय त्येला रोज. कुणीच ऐकलं न्हाई. माजं पोरगं तर दारातच सामान बांदुन तयार हुतं.”
नातवाला म्हणलं, “ये हिकडं, आपुन रोज चींगम खावु, ल्हान ल्येकरु वं ते, आलं माज्याकडं दुडुदुडु पळत. मदीच त्याच्या आईनं त्याज्या हाताला आसा हिसडा दिला, पोरगं पडलं डोक्यावर. आज्जे म्हणुन माज्याकडं यायचं म्हणत हुतं, माज्याकडं बगुन कळवाळुन रडत हुतं, पण कुत्र्याला वडत न्हेत्यात तसा त्येला न्हेला.”
आज्जी आठवणीनं ढसाढसा रडायला लागली, मघाची शान कुठल्या कुठं धुळीत मिळाली होती. नातवाच्या ओढीनं कळवळुन रडणारं एक म्हातारं माणुस, पिळवटुन टाकणारा तीचा तो आक्रोश, घट्ट धरलेली टोपली आणि डोळ्यात भयानक वेदना! माझ्याकडे कशालाच औषध नव्हतं आणि उत्तरही!
काहि सुचेना मला, आधार देण्यासाठी मी हळुच तीचा हात हातात घेतला, अंगावर वीज पडावी तसं मला झालं. इतक्या जोरात तो तीनं पकडुन दाबला. तीला कदाचीत तीच्या नातवाचाच वाटला असावा तो , त्या भावनेच्या भरात…माझ्याकडे डोळे विस्फारुन म्हणाली, “जावु नको थांब… थांब जावु नको. तुला चींगम देते… थांब, चींगम.”
मला वाटलं आता हिला वेड लागेल, साहजीकच होतं इतक्या वर्षापूर्वी झालेल्या जखमेची मी खपली काढली होती! एक वाघीण नातवाच्या आठवणीनं शेळी झाली होती… तीलाही पान्हा फुटला होता.
खुप वेळानं सावरली, म्हणाली, “लई वाट पाहिली मी त्यांची आन मंग ठरवलं, पोरगं आन सुन गेली खड्ड्यात, नातवाला शोधायचं.”
“मग मी घरच्या देवीला देव्हा-यातनं उचाललं आन म्हनलं, तुच पाळी आनलीस माज्यावर आशी, आता देव्हा-यात बसुन तु तरी काय करशील? रस्त्यावरच हिंडुन माज्या नातवाला मी शोधणार, तु बी हिंड आता माज्याबरुबर उनातानात. जवर मला माजं लेकरु मीळत न्हाइ तवर आमी दोगी बी अशाच गावभर फिरणार. ज्या दिशी माजा नातु सापडंल, तवाच तुला पुना सन्मानानं देव्हा-यात ठीवीन आसा नवस केलाय म्या. तवर हिला देव्हारा दावणार न्हाई!”
माझे डोळे पाणावले, याला वेडी माया म्हणु की भक्ती.?
मी चाचरत विचारलं, “आज्जी आता नातु मोटा झाला आसंल, तु त्याला वळकणार कशी?”
म्हातारीच्या उत्तराने मी उरला सुरला चींब भिजुन गेलो, म्हणाली, “मी त्याला कशाला वळकु? त्योच वळकंल मला. त्याच्या वयाचं पोरगं दिसलं की मी पीशवीतनं चींगम काडुन वीचारते, चींगम आवडतं का रं बाळा तुला? फुगा फुगवायला येतो का तुला तोंडानं? माजा आवाज त्यो बी इसरला नसंल, माजा आवाज ऐकुन त्योच आज्जे म्हणत माज्या गळ्यात पडंल…” असं म्हणुन तीचाही बांध फुटला!
पुण्यातल्या रस्त्यावरच्या गोंधळातही आज्जीच्या हुंदक्यांचा आवाज घुमत होता माझ्या कानात.
ब-याच वेळाने हळुच निर्जीवपणे उठली, चालायला लागली, मी काय प्रतिक्रिया द्यावी या विचारात असताना, काहितरी आठवल्यासारखं करुन परत फिरली आणि माझ्याकडे आली, म्हणाली, “डाक्टर येक काम करा, तुमी बी रस्त्यात फिरत आसतांय न्हवं? मंग येक काम करा, माजं लेकरु जर तुमाला भेटलं तर त्याला हे चींगम द्या. खा म्हणाव, त्याला सांगा आज्जीनं तुला लई हुडाकला. कोलापुरच्या घरात जर्मनच्या डब्यात आजुन लइ साटवुन ठेवल्यात ती बी घे, तवर माज्या पींडाला कावळा शिवणार न्हाई!”
हातात घेतलेल्या चींगमची ओंजळ माझी, माझ्याच अश्रूंनी भरुन गेली!
डॉक्टरसाहेब, तुम्ही पूर्णपणे रडवूनच सोडणार! तुमच्या लघुकथा व्हॉटसपच्या माध्यमातून वाचलेल्या होत्या. आत्ता वेबसाईटवरून काही वाचल्यावर प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहवेना! तुम्ही इतकं मनापासून काम करताय, पण त्याचं श्रेय सुद्धा घेत नाही. चक्क पोस्टमन म्हणवता स्वत:ला! Hats off to you!