पुण्यात एक पेशवेकालीन मंदिर आहे. मंदिराच्या एका बाजुला 10-12 आज्ज्या भीक मागत असतात. इथे एकाही पुरुषाला भीक मागण्याची “परवानगी” त्या देत नाहीत, या एरीयाच्या त्या सम्राटच आहेत जणु! भीक मागणं हा आपला अधिकार आणि लोकांचं कर्तव्य आहे असंच त्यांना वाटतं…
माझ्याशी त्या प्रेमानेच वागतात पण वागण्यात एक उन्मत्तपणा असतोच…
यांना मी खुप वेळा भीक मागणं सोडण्याविषयी चाचरत विचारतो, पण इतर वेळी मायेनं वागणाऱ्या आज्ज्या कामाचं नाव काढलं की चवताळल्यासारख्या अंगावर येतात. म्हणतात, “ए बाबा, तु डाक्टर हायेस, गोळ्या दिवुन वाटंला लागत जा, फाजील आन वावगं बोलत नगो जावु. तुला पटत नसंल तर हिकडं यीवु नगो, तकडल्या तकडंच जात जा!”
मी हिरमुसतो, खुपवेळा भयंकर राग येतो! ब-याच वेळा चार चौघात अपमान करायलाही त्या कमी करत नाहीत. आजुबाजुचे फुल / हारवाले बघत असतात, मला म्हणतात, “जावु द्या ना डॉक्टर, अशांसाठी स्वतःचा आत्मसन्मान कशासाठी गमावता? हे लोक xxx आहेत, नका करु अशांसाठी काम… तुमचं ऐकतच नाहीत तर कशाला शब्द वाया घालवता तुमचे? द्या ना सोडुन, मरुदे!”
हे ऐकुन मी अजुन दुखावतो… वाटतं “खरंच आहे यांचं, का मी एव्हढी डोकेफोड करु? माझं तरी काय अडलंय?” असं म्हणुन पुन्हा इकडे कधीही न येण्याचा मी निश्चय करतो… पण त्या मंदिराचा वार आला, की बाईक आपोआप तिकडे वळते, वाटतं, जाउदे – लहान मुल आणि म्हातारं माणुस हट्ट करणारच! बोलल्या काही तिरसटासारखं तर बोलुदे! माझी आज्जी पण अशीच वरवर तिरसटासारखं वागायची, पण प्रचंड प्रेम करायची माझ्यावर. यांचंही तसंच असेल, असं म्हणत मी पुन्हा जातो – त्यांना कामाबद्दल विचारतो – त्यांचे दहा शब्द ऐकुन घेतो – फुलवाले पुन्हा समजवतात – मी पुन्हा न येण्याची प्रतिज्ञा करतो… आणि परत इथंच येतो… हे आमचं दर मंगळवारचं ठरलेलं आहे, न चुकता!
खोदुन खोदुन चौकशी केल्यावर कळलं, कि यांच्या पणजोबांच्या वडिलांच्या स्वप्नात म्हणे त्यांच्या कुलदेवीने सांगितलं होतं, “तुम्ही काम नाही करायचं कुठं, मागुन मागुनच खायचं, नाहीतर तुमची वंशवेल खुंटेल…” आता त्यावेळच्या एखाद्या समाजाने, दुस-या समाजाला कधीही वर न येवु देण्यासाठी अंधश्रद्धेचं हे जोखड अडकवलं असणार हे उघड आहे ! तेव्हापासुन यांच्या सर्व पिढ्या भीकच मागतात… पण यामुळे अशा कित्येक पिढ्यांचं नुकसान झालं असेल?
अशा अंधश्रद्धांवर कोणीच काम केलं नसेल असं नाही, पण अशा काम करणा-यांना इथं कायमचं “गप्प” केलं जातं हा ताजा इतिहास आहे…
आता जन्मापासुन अशी रुजुन बसलेली अंधश्रद्धा दुर करणं माझ्या हाताबाहेरचं होतं… त्यासाठी त्यांच्या पणजोबांच्या वडिलांना किंवा कुलदेवीला इथं यावं लागलं असतं! असो! तर यांच्यासाठी काय करता येईल असा विचार करत असतांना एक शक्कल सुचली, आज ती लढवायची असा विचार करुन गेलो. जाताना मला मिळालेला नवा कोरा डिजीटल वजनकाटा घेवुनच गेलो.
त्यातल्या त्यात कमी चीडखोर आजीजवळ जावुन निर्वाणीचं बोललो, “आज्जी, हा काटा घेवुन बस, लोकं वजन करुन पैसे देतील, भीक मागु नको!”
अपेक्षेप्रमाणे आजी आलीच चवताळुन, “ए बाबा, चुलीत घाल त्यो काटा आन तुच वजन करत बस…” मला माहित होतं हे असंच होणार! पुन्हा विचारलं, “नको काटा?” आजीनं पदर सावरत काहीही न बोलता फणका-यानं जळजळीत नजरेनं माझ्याकडे पाहिलं… मी काय समजायचं ते समजलो!
म्हटलं, “बरं आज्जी, फक्त इथं तुझ्यापुढं काटा ठेवतो, माझं एक काम आहे बाजुला ते मी करुन येतो, तोवर काट्यावर लक्ष ठेव, मी आलोच एका तासात. आता पुन्हा मी येणार नाही इकडं, आजचा शेवटचा मंगळवार!” असं म्हणुन काटा चालु करुन जमिनीवर तीच्यासमोर ठेवला आणि मी निघालो. आज्जीनं ढुंकुनही पाहिलं नाही, ना माझ्याकडं ना काट्याकडं…
तीच्यापासुन दुर, मंदिराच्या कमानीत जे घोळक्याने थांबलेले भक्त होते, त्यांना हात जोडुन थोडक्यात सर्व सांगितलं आणि विनंती केली की, आजीपुढच्या काट्यावर वजन करुन तीला पैसे द्या…
या उपक्रमाचं कौतुक वाटलं असावं त्यांना, म्हणुन या लोकांनी वजन करुन तीला पैसे द्यायला सुरुवात केली. एकही पेशंट न तपासता पुढचे दोन तास मी हेच केलं आणि लोकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. हेतु प्रामाणिक असेल तर लोक मदत करतातच हे पुन्हा जाणवलं! एक डॉक्टर हात जोडुन आपल्याला विनवतोय हे बघुन ज्येष्ठ मंडळी भारावुन गेली…
मी दुरुन आजीची गंमत बघत होतो, गुपचुप फोटो काढत होतो, ती चिल्लर मोजण्यात दंग होती… बरोब्बर दोन तासांनी, मला काय झालंय ते माहितच नसल्यासारखा गडबडीने गेलो, म्हटलं, “चल आज्जी, दे काटा! निघतो मी आता, पुन्हा नाही येणार इकडं…”
जमिनीवरचा काटा तीनं लगबगीनं उचलुन छातीला लावला, ती बावरली. मी तीच्यापासुन काटा जवळजवळ हिसकावुनच घेत म्हटलं, “चल चल, मला द्यायचा आहे, दे पटकन उशीर झालाय मला…”
“आवो पन मला देनार हुता ना काटा? द्या की मंग!”
“तुला कशाला? तुला काय उपयोग त्याचा?”
“आवो हितं माज्याफुडं हुता तर वजन करुन पैसं दिलं लोकांनी. भीक मागण्यापरास ह्योच धंदा बरा हाय…”
“पैसे दिले?” मी खोट्या आश्चर्याने विचारलं. “किती जमले?”
तीने मोजले, बरोब्बर 341 रुपये भरले… दोन तासात 341 रुपये???
मोजलेली चिल्लर मी गोळा केली आणि माझ्या बॅगेत भरु लागलो, आज्जीचा आवाज तसा चढला, “ओ डाक्टर, माजं पैसं हायेत ते…” म्हटलं “काटा माझा, तुला नुसता सांभाळायला दिला होता, लगेच पैसे तुझे झाले होय? पैसे माझे आहेत हे आज्जी…” ती आता रडायच्या बेताला आली… बाकीच्या आज्ज्या हे सर्व दुरुन पहात होत्याच! मी काटा आणि पैसे घेवुन खरोखर निघालो, लगबगीनं ही आज्जी मागं आली, म्हणाली, “डाक्टर, वाटलं तर पैशे सगळे न्या पण मला काटा द्या, मी करीन ह्यो धंदा! पाया पडते मी तुमच्या, काटा परत न्हिवु नका…” आज्जीचे डोळे पाणावले…
बस्स आता ताणण्यात काहीच अर्थ नव्हता, तीला जवळ घेतलं, खिशातली 500 ची नोट दिली आणि म्हटलं “ही नोट तु घे, चिल्लर राहु दे मला, ही तुझी आजची कमाई आणि आगं, ह्यो काटा तुलाच आणलाय, ठेव तुलाच, इतके दिवस सांगत होतो तर ऐकत नव्हतीस!”
आज्जीनं मायेनं माझ्या डोक्यावरुन, गालावरुन हात फिरवला… मला हाताला धरुन नेलं आणि माझ्यासकट सर्व इतर आज्ज्यांना “च्या” पाजला…. “च्या” वाल्याच्या नाकासमोर 500 ची नोट हलवत बील देताना तीचा चेहरा आनंदानं ओसंडुन वहात होता…
निघायला उठलो, तशा दोन आज्ज्यांनी मला बाजुला घेत विचारलं, “फुडल्या मंगळवारी येनार ना तुमी?” मी मुद्दाम भाव मारत म्हटलं, “आता काय काम आहे? आता नाही परत येणार इकडं…” तशा म्हणाल्या, “आसं नगा करु, फुडल्या खेपंला आमाला दोगीस्नी बी आना दोन काटं, आमी पल्याडल्या बाजुला बसु…”
येताना पुन्हा दोन काटे आणायचं वचन देवुन मी निघालो… सहज मागे पाहिलं…
“धर्म करा वो दादा” असं आर्ततेनं हात पसरुन भीक मागणारी आज्जी आता “वजन करा वो दादा” म्हणत ताठ मानेनं आणि ताठ कण्यानं बसली होती…
आणि मी ही बाईकला किक मारली, पुढच्या मंगळवारी इथंच यायचं हे पक्कं ठरवुन, माझ्या इतर दोन आज्ज्यांसाठी!!!
Leave a Reply