दिवाळी गिफ्ट

मला नेहमी असं वाटतं की, ज्याला आपण जे गिफ्ट देतोय त्याला ते उपयोगी पडावं ख-या अर्थानं! भिक्षेक-यांना फराळ फटाके नवे कपडे देणं ही वरवरची चैन ठरेल आणि आपल्याला मिळालेलं तात्पुरतं समाधान !

अन्न वस्त्र आणि निवारा हि त्यांची खरी आणि कायमस्वरुपी लागणारी गरज आहे, माणसाने गरजा भागवुन चैन करावी.

आणि त्यांना या गरजा स्वाभिमानाने भागविता याव्यात यासाठी त्यांना शारीरिक, आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम करणं, स्वावलंबी बनवणं हे आत्ताच्या प्रसंगी गरजेचं आहे…

पण, यांना शारीरिक आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम बनविताना खालील बाबी या मोठ्या अडसर ठरतात.

 1. शारीरिक
  खांद्यातुन हात आखडणे, संधीवातामुळे उठता बसता न येणे, गुडघा, मनगट, घोटा यांचे स्नायु आखडणे! आणखीही ब-याच गोष्टी… यामुळे यांना इच्छा असुनही कष्टाचं काम करता येत नाही.
 2. आर्थिक
  कोणतेही स्किल असेल तर माणुस लाथ मारेल तिथे पाणी काढेल. पण हे लोक स्किल मिळवु शकत नाहीत कारण कोणतीही गोष्ट शास्त्रोक्त शिकण्यासाठी; त्याचं शिक्षण घ्यावं लागतं… आणि अशा शिक्षणासाठी यांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय ऍडमिशन देणार कोण? फी भरणार कोण? उच्चभ्रु इन्स्टिट्युट मध्ये, जिथं श्रीमंतांची मुलं शिकतात अशा ठिकाणी या “भिकारी” लोकांना उभं करणार कोण? म्हणजे कुठलेही स्किल मिळवण्याचा मार्गच खुंटला…
 3. मानसिक
  या सर्व बाबींमुळे त्यांची मानसिकता अशीच झाली आहे की, आम्ही भिकारी आहोत, भीक मागणं हेच आमच्या नशीबात आहे, आम्ही कोणताही कामधंदा करु शकत नाही, आम्हाला दुस-याच्या दयेवरच आयुष्यभर जगायचंय… हे पक्कं बसलंय त्यांच्या डोक्यात!

माफ करा, पण आपण सर्वजण यांना कपडे, फराळ आणखीही बरंच काही देवुन त्यांच्या या मानसिकतेला आणखी दृढ करतो! त्यामुळे भिकेवाचुनही जगता येतं, असा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही…

आणि म्हणुन कायमस्वरुपी त्यांना शारीरिक, आर्थिक आणि मानसिक स्वरुपी उपयोगी पडतील अशा भेटी मी शोधुन ठेवल्या आहेत…

 1. माझे मित्र श्री. विकास उत्तेकर हे मेडिकल क्षेत्राशी संबंधीत असुन, कोणत्याही आखडलेल्या सांध्यास ते शास्त्रोक्त पद्धतीने उपचार देवुन 30 मिनिटाच्या आत, त्या व्यक्तीस चालते करु शकतात. माझ्यासाठी विकास अशा लोकांना रस्त्यावर मोफत उपचार देवुन कष्टाचं काम करण्यास सक्षम करतील.
 2. बंधुसमान माझे मित्र डॉ. गणेश अंबिके, यांचे मेडिकल क्षेत्राशी संलग्न म्हणजे नर्सिंग, पॅरामेडिकल असे विविध कोर्सेस चे शिक्षण देणारे बहुआयामी असे कॉलेज आहे. इथं ऍडमिशन मिळणं म्हणजे आयुष्याचं कल्याण असं समजलं जातं! या माझ्या दोस्ताने वाईटात वाईट सर्व शक्यता गृहित धरुनही भिक्षेक-यांना संपुर्ण मोफत ऍडमिशन देण्याचं कबुल केलंय! अट एकच की, किमान अक्षरओळख हवी. संपुर्ण कोर्स झाल्यानंतर नोकरीची 100 टक्के हमी या पठ्ठयाने दिली आहे…
 3. श्री. नितीनभाई शहा या सहृदय दात्याने पाणीपुरीच्या पु-या तयार करण्याचे मशीन ट्रस्टला द्यायचं ठरवलं आहे. मशीनवर पु-या तयार करुन स्वस्त दरात होलसेल मार्केटमध्ये विक्री केल्यास खप निश्चित वाढेल. पु-या तयार करण्यापासुन ते विक्री करण्यापर्यंत सर्व बाबी भिक्षेकरी सांभाळणार! येणारा सर्व पैसा, भिक्षेक-यांत समान वाटला जाईल…
 4. माझी पत्नी डॉ. मनिषा सोनवणे, डॉक्टर फॉर ेगर्स या प्रकल्पाचा “कणा“, जी स्वतः योग गुरु आहे, तीला योगा कॉलेज काढण्याची नुकतीच परवानगी मिळाली आहे! या योगा कॉलेजमध्ये योगशास्त्राशी संबंधीत 12-15 प्रकारचे प्रॅक्टिकल कोर्सेस उपलब्ध असणार आहेत.

मला सांगायला खुप अभिमान वाटतो की डॉ. मनिषाने भिक्षेक-यांना मानवेल असा स्वतंत्र अभ्यासक्रम स्वतः तयार केला आहे. ज्यात त्यांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय ऍडमिशन मिळेल! अक्षरओळख असणे जरुरी नाही, संपुर्ण शिक्षण हे केवळ प्रॅक्टिकल पद्धतीचे….

कोर्स झाल्यानंतर, सर्टिफिकेट! आणि योग शिक्षक म्हणुन इतर संस्था किंवा स्वतःच्या कॉलेजात हमखास पगारी नोकरी…

वरील भेटी जर भिक्षेक-यांनी स्विकारल्या तर निश्चिंतपणे शारीरिक, आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने एक पाउल पुढे पडेल…

दिवाळीत पेशंट्स तपासणीपेक्षा या “गिफ्टच्या” ऑफर्स घेवुन मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे, त्यांना या गिफ्टस् स्विकारण्याची विनंती करणार आहे!!!

मला माहिती आहे की, पहिल्या फटक्यात मला यश येणार नाही, आणि मला ते नकोय सुद्धा !!!

पण प्रयत्न करायला, सुरुवात करायला काय हरकत आहे?

50 वर्षापुर्वी मोबाइल / काँम्प्युटर याचं नाव कोणाला माहीती तरी होतं का? पण आज काय परिस्थिती आहे? कोणीतरी स्वप्न पाहिलं, म्हणुन तर ते अस्तित्वात आलं!

मी पण स्वप्न पाहतोय भिक्षेक-यांच्या स्वावलंबनाचं… श्री. विकास, डॉ. गणेश, श्री. नितीनभाई आणि डॉ. मनिषा यांसारख्या “वेड्या” लोकांच्या जोरावर आणि अर्थातच तुमच्या शुभेच्छा आणि आशिर्वादाच्या बळावर!!!

आयुष्यात पहिल्यांदाच कोणाला काहितरी वेगळं गिफ्ट देण्याचा प्रयत्न करतोय… बघुया…

आणि हो, आपणां सर्वांस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*