माझ्या एक मावशी आहेत, श्रीमती अनुश्री भिडे. माझ्या भिक्षेकरी आज्ज्यांना एक दिवस चांगल्या हॉटेलात नेवुन खाउपिवु घालायचंय अशी इच्छा त्यांनी बोलुन दाखवली… हे लोक dependant होतील अशी कुठलीही गोष्ट करायला मी नाखुष असतो, पण माझ्या या मावशीचा मी शब्द मोडु शकलो नाही…
आज त्यांच्याबरोबर 4-5 आज्ज्यांसह छान हॉटेलात आम्ही भरपुर खाल्लं…
मावशीच्या पायगुणामुळे म्हणा, दोन आज्ज्यांनी आज भीकेच्या दलदलीतुन बाहेर येण्यासाठी मदत करण्याची विनंती केली! त्या आता भाजी / फळं / उकडलेल्या शेंगा विकणार आहेत…. येत्या मंगळवारी लागणारं सर्व साहित्य देण्याचं त्यांना मी कबुल केलंय…
आज मावशी खुष, हॉटेलात जाणाऱ्या आज्ज्या खुष आणि दोन आज्ज्या भिक सोडणार म्हणुन मी खुष!
तृप्त पोटाने आणि मनाने घरी चाललो होतो, वाटेतच एक मस्जिद आहे, तिथं ओळखीच्या आज्ज्यांचा एक घोळका दिसला, मोटरसायकल वाटेतच थांबवुन त्यांची ख्यालीखुशाली विचारली…
एकीने विचारलं, “बाबा जेवलास का रं?” मी सहज बोलुन गेलो, “आगं त्या आज्ज्यांबरोबर आज हाटेलात जेवलो…”
तीला वाईट वाटलं असावं, म्हणाली “तु त्यांला हाटेलात न्हेलंस, आमाला न्हाय कदी दावलंस हाटील… जा बाबा… तुजी मानसं हाईत ती, आमी कोन हाय तुजं?”
मलाही वाईट वाटलं, म्हटलं, “आगं आसं काय न्हाय म्हातारे, माज्या मावशीनं खर्च केला सगळा, माज्याकडं कुटं पैशे आसत्यात येवडे…”
पण तीचं समाधान झालं नसावं, तीनं तोंड फिरवलं…
मग म्हटलं, “बरं चला आत्ता येताय का हाटेलात जेवायला?”
सगळ्या हरखल्या… फटाफट सामान बांधलं बोचक्यात आणि पाचही जणी तयार झाल्या…
मोटरसायकल बाजुला लावली आणि आमची वरात निघाली, माझ्याकडे आधीच्या तीन माझ्या मोठ्या बॅगा, त्यात दोन आज्ज्यांनी त्यांची दोन बोचकी माझ्याकडं दिलेली! मी पुढे आणि मागे त्या… मोठं रमणीय दृश्य असावं…
शेवटी एका भारी हाटेलात शिरलो, दरबान माझ्याकडेच पहात होता… माझा अवतार पाहुन यांना प्रवेश द्यावा की नको या विचारात तो असतांनाच मी शिताफीने प्रवेश मिळवलाच!
आज्ज्या आतलं चकचकीत वातावरण बघुन आधी हरखल्या मग बावरल्या…
घाबरलेलं वासरु आपल्या आईला चिकटतं तसं सगळ्याच आज्ज्या मला बिलगु पहात होत्या… वासरांत लंगडी गाय शहाणी हि म्हण माझ्यामुळेच प्रचारात आली असावी अशी माझी खात्री झाली…
मी सहज पाकिट पाहिलं 440 रुपये! यांत काय येणार होतं? आज्ज्यांना तर स्वप्न दाखवलं… आता बाहेर जाण्यात कमीपणा होता, आणि पैसे नसतांना हॉटेलात कुणी थांबु देणार नव्हतं… खोटं खोटं हसणारा चार्ली चॅप्लिन आठवला! शेवटी क्रेडिट कार्ड सापडलं आणि आत्मविश्वास आला…
खुप खल करुन ऑर्डर दिली आणि काट्याचमच्या सहित आमची ऑर्डर आलीही!
काटेचमचे म्यान करुन हाताने युद्ध करण्याचा वटहुकुम त्यांच्या सेनापतीने म्हणजे मीच दिला…
आम्ही मस्त डिश नावाच्या ताटात रोट्या चुरुन, वरनं रस्सा ओतुन, आणखी “श्याम्पल” मागवुन भुरके मारत खायला सुरुवात केली… तो नजारा खुप जणं पहात होती, हे मलाही तिरक्या नजरेनं दिसत होतंच…
त्याच नजरेत एकदम दिसलं, एक आज्जी खात काहिच नव्हती, ताटाकडं शुन्य नजरेने पहात होती… म्हटलं “आज्जे, आगं खा की, मगाशी टाळ कुटत होतीस, हाटेलात नेत नाय म्हणुन , आता हाटेलात आणलंय तर खा की!”
आज्जी गप्पच!
मला राहवेना, जवळ गेलो, तशी म्हणाली, “कशी खावु ल्येकरा? माजी पोरगी बाळंतीण झालीया तीन महिन्यांपुर्वी, नव-यानं सोडलंय, माजी भिक मागुन जेवडं मिळतंय ते आमी खातुय पन त्यात भागत न्हाई… तीला दुधच येत न्हाई… आन म्हणुन पोटचं पोरगं बी रोज उपाशी आसतंय! आजुन मी घरी गेले नाही, ती उपाशी आसंल आन तीचं लेकरुबी… मी हाटेलात कशी खावु?”
मी गलबललो… एका पार्सलची ऑर्डर दिली… तशी म्हणाली, “नका वो सायेब आमाला आशी सवय लावु, आज द्याल पन उंद्या कोन दिल?”
एकंदर बोलण्यावरुन कळलं, त्या बाळाला सरकारी दवाखान्यात “कुपोषित” म्हणुन जाहिर केलंय… बाळ जगण्याची कोणतीही गॅरंटी नाही!
आदिवासी समाजात कुपोषित बाळं आहेत हे मला माहित आहे पण पुण्यासारख्या शहरात सुद्धा? माझ्यासाठी हे नविन होतं…
“ती आन तीचं बाळ उपाशी आसंल रे…” अस्सं आतडं पिळवटुन आज्जी बोलली, की माझीही खाण्यावरची वासना गेली…
मी म्हटलं, सरकारी डाक्टरनं काही ईलाज सांगीतलाय का ? तशी बोचक्यातनं तीनं एक मळका कागद काढला त्यावर लिहिलेलं होतं…. Similac IQ Plus powder Stage 1 for 4 months…
कुपोषित बाळांना पोषण देणारी दुधातुन द्यायची ही पावडर… आईच्या दुधाला पर्याय!
जग खरंच किती पुढं गेलंय ना? आईच्याही दुधाला पर्याय शोधलाय आपण… खरंच ही प्रगती म्हणायची की आपली अधोगती?
आज्जीनं माझी तंद्री तोडली म्हणाली, “महिन्यातुन चार डब्बे लागत्यात, एका डब्याची किंमत 600 रुप्पय आन चार महीनं द्यायची पावडर… एका महिन्यात 2400 रुप्पय कुटनं आनु मी?”
आज्जीनं अजुन एकही घास खाल्ला नव्हता… तीचा जीव तीच्या पोरीत, पोरीचा जीव तिच्या तीन महिन्याच्या पोरात!
शेवटी आज्जी म्हणाली, “म्या पोरीला सांगितलंय, मी मेले तरी चालंल पन तुला आन तुज्या लेकराला जगवणार… तु काळजी करु नगंस!”
पुन्हा माझा हात घट्ट धरुन म्हणाली, “डाक्टर, मला चार महिन्यासाटी काम बगा, महिन्याला 2400 रुप्पय मिळले पायजेत… त्ये पोरगं जगलं तर माजी पोरगी जगंल… पुना चार महिन्यानंतर मी मेले तरी बी चालतंय… फकस्त चार महिने सवड हाय मला!”
माझ्या डोळ्यातलं पाणी आज्जीनं तीच्याच पदरानं पुसलं… म्हणाली, “तु कशाला रडतुस बाबा… आमचं भोग हायेत ह्ये, तेवडं कामाचं बग…”
“आजुन येक सांगत्ये, मला त्यो टिबी का फिबी कसलातरी रोग झालाय, डाक्टर म्हणलाय, तु बी ईलाज कर न्हायतर तुजंबी काय खरं न्हाय… माज्या इलाजाला पैसं घालवलं तर माज्या लेकराची पावडर येणार न्हायी, म्हणुन मी माजी औषदं आणत न्हाई, पै आन पै साटवते पोराच्या पावडरीसाटी!”
“लेकराला टिबी हुयील म्हणुन त्याला जवळ घेत न्हाई घरी गेल्यावर मी, आन माजी लेक मला म्हणती, तु माज्या लेकराला जवळ का घेत न्हाय? तुला माजं लेकरु नगो झालंय! काय सांगु तीला? कसं सांगु तीला?”
आत्ता या क्षणाला मी डॉक्टर होवुन लोकांच्या वेदना मिटवु शकतोय याचा आनंद मानु की इतक्या भयाण वेदना भोगणा-या समाजात देवानं मला हे ऐकायला पाठवलं याचं दुःख मानु, मलाच कळत नव्हत…
आज्जीला म्हणालो, “तु काम करु नको, TB मुळं तुला अशक्तपणा आलाय, मी चार महीने या पावडरीचे डब्बे तुला पुरवण्याचा प्रयत्न करतो… आणि तुलाही TB च्या गोळ्या चालु करु, तुझी तब्येत एवढी खालावली आहे की, तुला कोणतंही काम झेपणार नाही… सध्या काम नको करुस, मी देईन तुला ही पावडर!”
पुनर्वसनाच्या या कामात मी आयुष्यात पहिल्यांदाच कोणाला तरी सांगत होतो की काम नका करु! देव बहुतेक माझीच थट्टा करत होता…
आज्जीच्या निर्जीव डोळ्यात थोडी चमक आली, म्हणाली “जमंल तुला ही पावडर द्यायला? लेकरु वाचव रे माजं… लेकरु तुज्या पावडरीनं वाचलं तर फुडल्या भाउबीजंला माजी लेक तुला ववाळंल, आमचं लेकरु आमी तुज्या पायाशी घालु… आत्ता मातुर एकदा त्याला पोटाशी घे रे… मला काही गोळ्या नको, माज्या वाटणीचा खर्च माज्या लेकरावर कर!”
मला काय बोलावं तेच कळेना, म्हटलं “आता देणार आहे ना मी पावडर? चल खावुन घे आता!” यानंतर आज्जी पोटभर जेवली त्यानंतर…. जेवता जेवता स्वतःबरोबरच बोलत होती, “आता मी मेले तरी चालंल पन माज्या लेकीला भाउ मिळाला… आता माजं लेकरु जगंल…”
मी तीच्या निर्जीव, पण समाधानी चेह-याकडे पहात होतो! एकटक…
तेवढ्यात एक आज्जी बोलली, “डाक्टर तुमी नाय जेवला? आता कशाची वाट बगताय?”
मी हळुच बोललो, “मी वाट बघतोय पुढल्या वर्षीच्या भाउबीजेची!”
या वाक्याचा अर्थ फक्त “त्याच” आजीला कळला… ती डोळ्यात पाणी आणुन दुरुन माझ्याकडे पहात होती आणि मी तीच्याकडं…
अप्रतिम ड्रा साहेब तुमच्या पत्नी च मोल चा हात असेल यात