माईंचा आशिर्वाद!

आज 14 नोव्हेंबर, 11जणांच्या डोळ्याच्या तपासण्या त्यात आमच्या माईंचा वाढदिवस..!

बालदिन हाच माझ्या माईचा वाढदिवस! माझ्यासाठी हाच मातृदिन…!!!

दोन्ही ठिकाणी जाणं अत्यंत गरजेचं… पण वेळा कशा सांभाळायच्या? कारण माई दुपारी वर्ध्याला जाणार, दुपारपर्यंत मी दवाखान्यात…

त्यात माझा मुलगा सोहम, फुटबॉल खेळतांना काल पडला, उजवा घोटा टम्म फुगलेला, इतर डॉक्टर म्हणाले, अरे X-Ray काढावा लागेल! त्याला चालताच येइना… आता कधी काढायचा X-Ray ?

मनीषाला म्हटलं, “मी मंगळवारी सकाळी भिक्षेक-यांच्या तपासणीसाठी जातो, तु सोहमला X-Ray साठी घेवुन जा, पुन्हा मग मी दुपारी माईंचा आशिर्वाद घ्यायला एकटाच जाईन…”

ठरवुन सोमवारी झोपलो…

आज सकाळी लवकर उठलो तर सोहम माझ्या आधी तय्यार….

मी म्हटलं, “काय X-Ray ची तयारी काय?” म्हणाला, “नाही पप्पा, आज बालदिन आहे, मला सुट्टी आहे… आज्जीआजोबांच्या तपासणीला मी येतो तुला मदत करायला शिवाय माईंकडे पण…!”

मी म्हटलं, “अरे तुझा पाय? X-Ray?”

म्हणाला, “पप्पा एकच पाय मोडलाय, दुसरा आहे की व्यवस्थित…!” असं म्हणुन हसायला लागला…

एका आज्जीने हेच तत्त्वज्ञान मला पुर्वी सांगीतलं होतं, आज माझं पोरगं तेच तत्त्वज्ञान मला सांगत होतं… संस्कार कसे परावर्तीत होतात त्याचं हे जीवंत उदाहरण…

मी त्याच्या पायाला बँडेज बांधलं, म्हटलं “चल बाबा, तु कोणाच्या “बापाचं” ऐकणार आहेस का?”

पुण्यातले 11 भिक्षेकरी वेगवेगळ्या ठिकाणांहुन गोळा केले, त्यांना कारने दवाखान्यात आणले, सोबत रॉबीनहुड चे एक कार्यकर्ते मदतीला होते, बिचारे पडेल ते काम करत होते… कार ड्राईव्ह करणे, डिकीतुन सामान काढणे, भिक्षेक-यांसाठी आणलेल्या कुबड्या / व्हिलचेअर यांवर फडकं मारुन स्वच्छ करुन त्यांना ती देणे… आणखीही बरंच काही…

मी त्यांना म्हटलं, “सर, आपली ओळख?” तर, आधी काही बोलेचनात… खुप विचारल्यावर म्हणाले, “मी रहेजा, रहेजा बिल्डर्सचा मालक..!”

मी नखशिखांत शहारलो… रहेजा साहेब… यांना भेटायला 15-15 दिवस आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते, मोठमोठी लोकं लायनीत यांच्याशी 5 मिनीटं तरी बोलायाला मिळावं यासाठी तासतासभर थांबतात… आज हे इथं… कोणताही बडेजावपणा न सांगता…?

मी नकळतपणे त्यांचे पाय धरण्यासाठी वाकलो आणि दिलगीरी व्यक्त केली, तर म्हणाले, “अरे बाबा, तुम्ही या कामाची मला संधी दिलीत मीच आभारी आहे तुमचा!”

माझ्या डोळ्यात पाणी तरळलं आणि या वाहत्या पाण्यात हा मोठा माणुस न सांगता कधी विरघळून नाहिसा झाला मलाही कळलं नाही… एका साध्या थँक्सचीही अपेक्षा न ठेवता…

खरंच माणसं किती मोठी असतात… अशावेळी आपलं खुजेपण नक्कीच जाणवतं..!

असं म्हणतात, अत्तराच्या दुकानात काम करणा-याचे हातही सुगंधी होतात… तसंच, अशा लोकांच्या सहवासात मी सुगंधी होवुन जातो… नाहीतर माझ्यासारख्या दिडदमडीच्या माणसाची काय औकात?

यानंतर मग मी सोहम आणि पवन ने पुढची खिंड लढवली, 11 पैकी 4 ऑपरेशन , 4 चष्मे देण्यायोग्य आणि 3 केवळ ड्रॉपने बरे होणारे अशी वर्गवारी, पुन्हा सर्वांची रक्त / लघवी तपासणी अशा सर्व दिव्यातुन बाहेर पडलो आणि माईंकडे जायला निघालो…

माई माझं दैवत!!!

प्रत्येक राष्ट्रात त्यांचा त्यांचा देव असतो… गणपती , विठ्ठल महाराष्ट्रातले, येशु तीकडं अमेरिकेत,पशुपतीनाथ नेपाळला, जीझस वैगेरे ब्रिटन मध्ये, रावण श्रीलंकेत…

प्रत्येक देवाला आपण सीमारेषा आखुन दिल्यात… प्रत्येकाच्या पुजा वेगवेगळ्या… प्रत्येकाचे विधी वेगवेगळे…

पण माई… (सिंधुताई सपकाळ ), हे एकच दैवत असे की या देवाला सीमारेषा नाहीत… जेव्हढा मान भारतात, तेव्हढाच रशियात, तेव्हढाच अमेरिकेत आणि तेव्हढाच जपानमध्येही..!

कुठेही जा… सगळ्यांची पुजा सारखीच आणि विधीही सारखेच… भाषा वेगळी असेल पण… भक्ती तेव्हढीच!

रोज मी मंदिरं आणि मशिदी पालथ्या घालतो, पण कुठलाही देव बोललेला मी अजुन पाहिला नाही… माझा हा देव मात्र सर्वांना पदराखाली घेतो… सगळ्यांना इथं सारखीच किंमत…

गंगेच्या पात्रातला गोटाही देव्हा-यात जावुन बसतो… तसा माझ्यासारखा एखादा भुक्कड माणुसही तीच्या सान्निध्यात पवित्र होवुन जातो, ही तीची महती!

आज माईंचे आशिर्वाद मी मनीषा आणि सोहमने घेतले… हजारोंची गर्दी बघुन जाता जाता मनिषा सहज बोलुन गेली, “जिसकी उम्मीदें टुट जाती है वो हर व्यक्ती यहां चली आती है”

मी म्हटलं, “माई हौसलों की दर्जी हैं मुफ़्त में रफ़ू जो करती हैं!”

सोहम पाय मोडुनही, मोडक्या पायाने माझ्या मदतीला येतो काय… भिक्षेक-यांसाठी काम करतो काय… माईंचा आशिर्वाद घेतो काय…

आजच्या बालदिनाच्या (माझ्यासाठी माईदिन) दिवशी माझ्या कामाचा उत्तराधिकारी सापडला असं मला वाटतं…

हा निव्वळ योगायोग समजावा की माईंनी दिलेला आशिर्वाद?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*