वाईतला एक मुलगा…
एकुलत्या एक मुलाला सोडुन आई आणि वडिल देवाघरी गेलेले…
मुलाचा सांभाळ मामाने केला जमेल तसा…
मुलगा मोठा झाला, पुण्यात आला काम शोधायला…
केटरींग व्यवसायीकाकडे वाढपी आणि मोरीवाला (भांडी घासणे) म्हणुन काम मिळालं…
मुलगा स्वतःच्या पायावर उभा होता… खुप छान नाही, पण एकुण बरं चाललं होतं…
कसं कुणास ठावुक, पण एके दिवशी मोरीतल्या निसरड्या फरशीवरुन पाय घसरला… आणि अतिशय विचीत्र पद्धतीने नळावर पडला…
तो असा विचीत्र पद्धतीने नळावर पडला, की शरीरातले लघवी होण्याचे अवयव निकामी झाले…
मालकांनी दवाखान्यात नेलं… डॉक्टरांनी सांगीतलं एक मोठं ऑपरेशन करावं लागेल… मालक इतक्या खर्चाला तयार नव्हते…
आता लघवी होण्याचे अवयव निकामी म्हणजे… लघवीचा मार्गच बंद… भयानक वेदना…! शिवाय लघवी साठुन साठुन उरलेले अवयव फुग्यासारखे फट्टकन् फुटण्याचा धोका… म्हणजे काही तासांत जीव जाइल अशी अवस्था…!
तात्पुरता उपचार म्हणुन डॉक्टरांनी जुजबी व्यवस्था करुन दिली…
एक रबरी नळी… नाभीखालुन पोटात सरकवली आणि तीचे दुसरे टोक दुस-या एका रबरी पिशवीला जोडलं… आता किमान लघवी पोटात साठुन जीव जायचा धोका संपला…
पण निकामी झालेल्या अवयवांचं काय…?
शिवाय ही लघवीची पिशवी 24 तास हातात धरुन ठेवायची… उठतांना, बसतांना, झोपतांना… किती हा त्रास…!
आता, होती ती नोकरी गेली… नवीन मिळेना… लग्नाचं, संसाराचं स्वप्न मोरीतनं सांडपाणी वहावं तसं वाहुन गेलं… बरं कुणाला ही अवस्था पाहुन वाईट वाटावं असं जवळचं कुणीच उरलेलं नव्हतं…!
ऑपरेशनचा खर्च आपल्याला करावा लागेल या भितीने मामाने अगोदरच दार बंद केलं होतं…
कसातरी जीव जगवणे… यासाठी त्याने सोपा मार्ग शोधला… देवाच्या दारात भीक मागणे… एवढा एकच रस्ता त्याच्यासाठी खुला होता… लाचारीने त्याने तो पत्करला…!
अशाच एका मंदिराबाहेर बरोब्बर तो सहा महिन्यांपुर्वी मला भेटला…
सर्व काही सांगुन म्हणाला… बघा ना डॉक्टर काही होतंय का माझं?
जुने पेपर्स घेवुन मी चार पाच प्रायव्हेट डॉक्टर्सना स्वतः भेटलो, ते म्हणाले, सुपर स्पेशालीटी हॉस्पिटलला हे ऑपरेशन करावे लागेल… शिवाय अतिशय स्कील लागणारे हे विशेष ऑपरेशन आहे…! याचा खर्च साहजीकच खुप मोठा…!
डॉक्टर म्हणुन दिलेली सवलत शिवाय सामाजीक काम म्हणुन कमी केलेली रक्कम वजा करुनही ऑपरेशनला लागणारा खर्च ऐकुन माझेच डोळे फिरले…
इतका खर्च एकट्यासाठी करणं मलाही कदापी शक्य नव्हतं…
बरं, याच्याकडे कुठलंही कागदपत्रं नसल्यामुळे कोणत्याही सरकारी योजना याला लागु नाहीत…!
दरवेळी मी दिसलो, की हातात पिशवी सांभाळंत, मांडीला मांडी घासणार नाही अशी काळजी घेत, रबरी नळीला धक्का पोचणार नाही असा फार दयनीय अवस्थेत चालत यायचा… आणि त्याहीपेक्षा दयनीय चेह-यानं विचारायचा… “काही झालंय का कुठं डॉक्टर?”
मी निराशेने तोंड लपवत “प्रयत्न चालु आहेत” असं मोघम उत्तर द्यायचो…
मी खरंच प्रयत्न करत होतो पण पैशाचं सोंग आणता येत नव्हतं…
पुढं पुढं तर हा भेटेल… मला पुन्हा प्रश्न विचारेल म्हणुन त्या बाजुला जायचीच भिती वाटायची मला…
तरी मी जायचो… तो यायचा… नेहमीचेच प्रश्न विचारायचा आणि मी ही नेहमीचंच उत्तर द्यायचो… “प्रयत्न चालु आहेत…!”
माझीच मला लाज वाटायची…
शेवटी पुण्यातल्या एका मोठ्या सरकारी दवाखान्यात प्रयत्न करायचं ठरवलं… याला तीकडे पाठवलं… एकट्याला… हा तिकडे जावुनही आला…
आल्यावर म्हणाला कुणी लक्ष देत नाहीत तिकडे, शिवाय तपासण्या करायल्या सांगितलेत, त्या केल्याशिवाय पुन्हा इकडे येवु नकोस असं सांगीतलंय…
आता तुम्हीच चला माझ्याबरोबर, नाहीतर मी पण जाणार नाही, मेलो तर मरुदे आता… मलाही कंटाळा आलाय सगळ्याचा..!
शेवटी त्याच्याबरोबर जावंच लागलं…
प्रत्येकवेळी त्याच्याबरोबर जावुन सर्व तपासण्या आणि बाकीचे सर्व सोपस्कार केले…
नाही म्हणायला याही वेळी भुवड बाबा व ताई होत्याच बरोबर… पण एकाच पेशंटसाठी माझा इतका वेळ घालवणं मलाही परवडेना…
पण, अभ्यासात एखादा विषय अवघड असेल तर त्याला जास्त वेळ द्यावा लागतोच, असं स्वतःच्या मनाचं समाधान करुन दरवेळी मी याला बरोबर घेवुन जायचो…
डॉक्टर स्वतः बरोबर आलेत, म्हटल्यावर कामंही थोडी लवकर व्हायची… फटफट गोष्टी उरकल्या जायच्या… कागदपत्रं लवकर ताब्यात मिळायची… सगळं खरं होतं पण मुळ ऑपरेशनचा पत्ता नव्हता… खर्चाची काहीच तजवीज नव्हती…
तो माझ्यावर विसंबुन बिनधास्त होता… पण धास्तावलेला मीच होतो… खर्चाचं काय…?
शेवटी खुप लटपटी करुन ससुन हॉस्पिटल पुणे अंतर्गत इन्फोसीस सुपर स्पेशालीटी हॉस्पिटल पुणे येथे हे ऑपरेशन करायचं ठरवलंय…
ऑपरेशन मोफत होईल पण ऑपरेशन ला लागणा-या वस्तु मी आणुन द्यायच्या या बोलीवर हे ऑपरेशन ठरलंय…
वस्तुंना लागणारा खर्च आहे ब-यापैकी… पण ठिक आहे माझ्या आवाक्यात आहे…
मुळात सुपर स्पेशालीटी हॉस्पिटलला ऑपरेशन ठरलंय म्हटल्यावर मी नाचायचाच बाकी होतो…
याला आम्ही ७ एप्रिल ला ऍडमिट करणार आहोत… ९ तारखेला ऑपरेशन होईल…
आता या मुलाच्या हातातली ती पिशवी जाईल, मला विचारणारी ती प्रश्नार्थक नजर बंद होईल, माझं तोंड लपवणं बंद होईल, मुळात पोटात सहा महिन्यांपासुन असलेली रबरी नळी जाईल, नोकरी मिळेल, लग्न होईल, एक भिक्षेकरी पुन्हा गांवकरी होईल कष्टकरी होईल…
कोणत्या शब्दांत मी माझा आनंद कसा मांडु…?
आम्ही दोघंही आनंदात होतो… दोघंही हवेत…
२ एप्रिल ला, सगळं त्याला समजावुन मी हॉस्पिटल च्या आवारातुन बाहेर जायला लागलो… तर हा म्हणाला, “सर सॉरी बरं का…”
मी म्हटलं, “का रे ?”
“सर प्रत्येकवेळी तुम्हाला इकडंतिकडं नाचवलं… माझ्या एकट्यासाठी तुम्ही इतरांना ताटकळत ठेवलंत…!”
अच्छा, म्हणजे याला ही जाणीव होती तर…
मी त्याचा हात हातात घेवुन म्हटलं, “जावु दे रे… आपलं न होणारं काम तरी झालं… मला वाटतंय मी स्वप्नातच आहे यार…!”
एका हातानं धरलेला माझा हात दोन्ही हातात घेवुन पुन्हा म्हणाला, “आणि थँक्यु पण बरं का सर…!”
मी हसत म्हटलं, “आता थँक्यु कशाला…?”
म्हणाला, “आतापर्यंतचा आणि इथुन पुढं होणारा खर्च तुम्ही करताय!”
“मी कसं फेडणार हे तुमचं कर्ज? पण नोकरी लागल्यावर जमेल तसं परत करण्याचा प्रयत्न करेन…!”
मी म्हटलं, “एक मिनीट, बरं झालं बोललास… पण हा खर्च मी एकट्याने केलेला नाही बरं का…!”
“मला खुप लोक मदत करतात…हे सगळे पैसे त्यांचे आहेत…”
“जो काही खर्च आतापर्यत झाला असेल… त्या खर्चाला किमान ५० लोकांचे हात लागलेत… आणि ऑपरेशन चा खर्च पकडलास तर अजुन ५० लोकांचे हात लागणार आहेत…”
“हे एक, दुसरं असं… उपकाराचं म्हणशील तर ही साखळी आहे… मला कधीतरी तुझ्या भाउबंदाने मदत केली होती… म्हणुन आज मी तुला मदत करतोय… आज तुला मदत मिळाल्येय तर उद्या तुझ्यात ताकद आल्यावर तु दुस-याला मदत कर… तो ही मग उद्या तिस-याला करेल…”
“ही साखळी फक्त तुटु देवु नकोस… क्काय… कळलं काय?”
एव्हाना त्याच्या डोळ्यांतुन अश्रुंच्या धारा लागल्या होत्या… त्याने लहान मुलासारखे ओठ घट्ट मिटुन घेतले होते… हुंदका आवरत नव्हता… माझा हात दोन्ही हातात त्याने घट्ट पकडुन ठेवला होता… आवारातले कित्येक लोक आमच्याकडे पहात होते…
मी कसंनुसं हसत म्हटलं, “बरं चल जा आता… नाहीतर मलाही रस्त्त्यात रडवशील…”
हातातुन हळुच हात सोडवत तो म्हणाला, “पण सर या लोकांनी मला पाहिलंही नाही, यांनी माझ्या तपासणीचे पैसे दिले?” अविश्वासाने त्याने विचारले…
मी म्हटलं, “तपासणीचेच नाही वेड्या, तर तुझ्या ऑपरेशन ला लागणारे पैसे पण आधीच दिलेत मला त्यांनी…!”
“ऑपरेशन व्हायच्या आधीच यांनी पैसे दिलेत? वेडे आहेत काय हे लोक?” स्वतःशीच बोलावं असं तो बोलला…
मी हसलो, मनात म्हटलं… “अरे खरंच वेडे आहेत हे लोक… तुलाच काय, त्यांनी मलाही पाहिलं नाहीय…”
काळा आहे का गोरा हा भिका-यांचा डॉक्टर हे ही त्यांना माहित नाही… पण जीव तोडुन प्रेम करतात माझ्यावर… मदत करतात… आशिर्वाद देतात…!
सध्या शहाण्या लोकांच्या शहाणपणावर नाही रे, अशा वेड्या लोकांच्या वेडेपणावर हे जग चाललंय…
मला तो म्हणाला, “सर, मला त्यांचे पण आभार मानायचेत… कसे मानु?”
मी म्हटलं, “मी कळवेन त्यांना तुझे आभार… तु सांग… काय सांगु मी त्यांना…?”
पुन्हा डोळ्यात पाणी, जोडलेले हात… आणि घट्ट मिटलेले ओठ… मग हुंदका… त्याला बोलताच येत नव्हतं… हातानं सुंदर… छान अशी काहीतरी तो खुण करुन दाखवत होता…
आता डोळे ओले होण्याची माझी पाळी होती…
मी किती ठरवतो तरी हे लोक रडवतातच मला… रस्त्यातही…
आता तुम्हां सर्व आशिर्वाद देणा-या, शुभेच्छा देणा-या, हरत-हेने मदत करणा-या “वेड्या” लोकांना एकच विनंती…
त्याची ही हातानं दाखवलेली “सुंदर” ची, “छान” ची खुण, त्याने आपणांस दिलेले आभार म्हणुन आपणांकडुन स्विकार व्हावा… स्विकार व्हावा… हि विनंती…!!!
Leave a Reply