आज आणखी सहा लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन्स झाले…
या डोळे तपासणीचा सिलसिला कसा सुरु झाला…?
मला आठवतो नोव्हेंबर २०१७ चा महिना…
एक आजोबा होते… दोन्ही डोळ्यांना मोतिबिंदु… भिंतीच्या किंवा कुणाच्यातरी आधारानं चालायचे… दिसत नाही म्हणुन आत्मविश्वास गमावुन बसलेले…
मला सारखं म्हणायचे, “डाक्टर, डोळ्याचं बगा की कायतरी…”
मी बाहेर चौकशा केल्या… दोन्ही डोळ्यांचे हायटेक ऑपरेशन्स साठी ६०००० ते ७०००० खर्च…
बापरे, मी कुठुन करणार…?
शेवटी लायन्स क्लब मार्फत चालविल्या जाणाऱ्या हॉस्पिटलमधील डॉ. वैभवी रावळ मॅडम ची भेट घेतली, आणि अत्यंत वाजवी फी मध्ये हे ऑपरेशन्स करण्याचं त्यांनी कबुल केलं…
या एकाच बाबांचं ऑपरेशन करुन द्यायचं आणि पुन्हा या वाटेला यायचं नाही असं मी मनाशी पक्कं ठरवलं होतं…
त्याप्रमाणे ऑपरेशन झालं देखील… ऑपरेशन नंतर भिंतीला धरुन चालणारे आजोबा जेव्हा बिनदिक्कत पणे धाडधाड पाय-या उतरु लागले… तेव्हा माझा विश्वास बसेना….
कुणाच्याही आधाराशिवाय आपण आता चालु शकतो यावर त्यांचाही विश्वास बसेना..
भेटल्यावर ते हात हातात घेवुन भरल्या डोळ्यानं म्हणाले, “डाक्टर, तुमी कशे दिसता ते आज मला समजलं, नायतर अंधुक डोळ्यांना फकस्त तुमची छबी दिसत हुती इतके दिवस…आता डोळ्यात साटवुन ठीवीन तुमाला…”
मी हसलो, म्हटलं, “बाबा आता भिक मागायची नाही… दिसायला लागलंय तुम्हाला, आता काम करायचं बरं का…!”
“आता हितुन फुडं न्हाई मागणार, आवो पन भिक मागत का हुयीना तुमी मला भेटला… आन्…”
पुढचं वाक्य घशातच अडकलं… बोलु शकले नाहीत ते… डावा खांदा माझा अश्रुंत भिजुन गेला त्यांच्या…
जाताना म्हणाले, “पोटापुरतं कमवुन खाइन, आता कशाची हाव धरनार न्हाइ… पन डाक्टर तुमी वयानं लहान हाय माज्यापेक्शा म्हणुन सांगतो, मानसाला सगळ्याच गोष्टीची लइ तहान आसती… मेल्यावर पन ती तहान जात न्हाय… म्हनुनच मेल्यावर अस्थी सुदा पाण्यातच विसर्जन करतात बगा…”
मी बघत राहिलो… खरंच होतं ते…!
ते निघाले… पाठमो-या आकृतीकडे पहात मी म्हटलं, “काळजी घ्या बाबा…”
तर पुन्हा मागं आले… भावुक होवुन म्हणाले, “काळजी घ्यावीच लागंल डाक्टर , आवो ज्याची काळजी घ्यायला कुनी आसतंय, त्यो बिनधास्त जगतो… ज्याची काळजी करनारं कुनीच नाही, त्योच भिवुन वागतो…”
“आपली काळजी आपनच करायची… काळजी घेणारी माणसं कधीच सोडुन गेली…” असं म्हणुन ते भकास हसले.
“डाक्टर जखम झाल्यावर परतेकालाच दुकतं, पन आपल्या दुकन्यावर मलम लावायला कुनी उरलंच न्हाय याचा तरास सगळ्यात जास्त आसतो…”
बाबा बोलत राहिले, भडाभडा…
चंदनाच्या लाकडाला जेव्हढं बारीक कापावं, तेवढा त्यातुन सुगंध जास्त येतो…
बाबांचंही तसंच झालं होतं… प्रत्येक वेदनेत त्यांनी नवा अनुभव घेतला होता. आयुष्य जगतांना आनंद मिळण्यापेक्षा अनुभव जास्त मिळत गेला…
त्यांच्याशी बोलतांना अजुन एक विचार मनात घर करुन गेला…
माणसानं समुद्र होवुन जगावं… उंचच उंच लाटा आभाळात उडवाव्यात मस्तीने… घुसळुन निघावं अंतर्बाह्य… पण काठावर येताना मात्र जरा जपुनच यावं..
काठावर येताना लाटा घेवुन काठावर आदळायचं नसतं…
अलगद इथं येवुन पसरायचं असतं धुक्यासारखं…
काठाला जपायचं असतं…
इथं पाणी पाणी होवुन जायचं असतं…
आपलं समुद्रपण विसरायचं असतं..!
प्रत्येक समुद्राने आपल्या काठाची जर काळजी घेतली तर त्याचा सारा खारटपणा आम्ही “चव” म्हणुन मिरवु !!!
असो !
या एकाच बाबांचं ऑपरेशन करुन द्यायचं, या विचारावर ठाम असलेला मी, ऑपरेशन नंतर बाबांमध्ये झालेला अंतर्बाह्य बदल पाहुन भारावुन गेलो… आणि ठरवलं… जमेल तेव्हढ्यांना दृष्टी द्यायची… आत्मविश्वास द्यायचा… त्यांच्यातला माणुस “डोळे” भरुन पहायचा…
पुढचा महिनाभर मग डोळ्याचे पेशंट्स साठवत गेलो… ३० च्या वर पेशंट्स झाले. दवाखान्यात नावनोंदणी केली…
आणि सगळ्यात शेवटी पैशाचं गणित मांडलं. मिळालेला निधी कमी पडत होता, पण आता मागं येणं शक्य नव्हतं, कारण ऑपरेशन ची तारीख ठरली होती आणि न दिसणा-या, या लोकांच्या डोळ्यांना मीच आशा दाखवली होती…
दोन दिवसांवर ऑपरेशनं आली, पैसे नव्हतेच…
मनिषाने लग्नातला तीन तोळ्याचा नेकलेस मला दिला आणि म्हणाली, “PNG मध्ये गहाण ठेव, लागतील ते पैसे वापर, नंतर पुढे सोडवु…”
तीन तोळ्यांचं वजन खरंतर माझ्या दोन हातांनाही पेललं नाही तेव्हा…!
कुणाकुणाचं ऋण मी कसं कसं फेडणार आहे, मलाच माहित नाही…
आजही मनिषाला नेकलेस बद्दल विचारलं तरी ती हसत सांगते, “जावु दे रे, तो माझ्या “नेक” मधुन “लेस” होणारच होता, म्हणुनच त्याला “नेकलेस” असं नाव आहे…!”
“बाईसाठी तीची टिकली महत्वाची, पैंजण सोन्याचं असलं तरी पायातच घालतात, कुणी डोक्यावर घेवुन मिरवत नाही, आणि टिकली रुपया दोन रुपयाची असली तरी ती कपाळावर घेवुन मिरवतात…”
“किंमतीवर अस्तित्व नसतं… अस्तित्वावरुन किंमत ठरते…”
काय बोलु मी यावर…?
नोव्हेंबर २०१७ साली मी हा डोळेतपासणीचा “खेळ” मांडला, आणि समाजानं यात मला हात दिला… भरभरुन मदत केली…
मनिषा च्या मदतीनं लावलेल्या या रोपट्याचं आज एक छोटं का असेना पण झाड झालंय…
आज अखेर ९४ लोकांना तुम्हां सर्वांच्या मदतीनं दृष्टी देवु शकलो… हे श्रेय मला “डोळे” झाकुन मदत करणा-या प्रत्येकाचं… प्रत्यक्ष येवुन पडेल ते काम करणा-याचं…
खुप लोक माझ्यावरच्या प्रेमापोटी मला म्हणतात, “अरे अभिजीत तु हे छान केलं, ते छान केलं…”
मलाच काहीवेळा कळत नाही, मी नेमकं केलंय काय?
मीच ति-हाईतासारखा बरेचवेळा स्वतःला विचारतो, “हे कुणी केलंय? का केलंय? कसं केलंय? आणि मुळात कशासाठी केलंय?”
खरंच सांगतो, यांतलं हे मी काहीही केलेलं नाहीय… कुणीतरी करवुन घेतलंय… कुणीतरी करवुन घेतंय…
असं पहा कि, एखादी कितीही भरधाव पळणारी गाडी मुळात निर्जीव असते, तीला स्वतःचं काहीच स्वतंत्र आस्तित्व नसतं…
पण तरीही ती पळते…
कारण तीला पळवणारं इंजीन असतं…
गाडीत टाकलेलं इंधन असतं…
आणि तीला योग्य दिशा देणारा ड्रायव्हर असतो…
या सर्वांच्या संमिश्र मिलाफामुळे ती गाडी पळते…
यातली एकही गोष्ट नसेल तर ती गाडी म्हणजे निर्जीव शोभेचा दिखावाच असतो…
मनिषासह, आपण सर्वचजण या गाडीचे इंधन आहात… इंजीन आहात… सुजाण चालक आहात…!
आणि मी? मी म्हणजे ती निर्जीव गाडी…
तुम्ही चालवाल तशी चालणारी, वळवाल तशी वळणारी…
माझा वाटा बस्स एव्हढाच !!!
Leave a Reply