जोगवा…

मंगळवार..! हा वार देवीला वाटुन दिलाय…

समाजातल्या एका घटकावर काही वर्षांपुर्वी देवीच्या नावानंच भीक मागुन जगा, शिकु नका, कामधंदा करु नका, अन्यथा देवीचा कोप होईल असा एक विचार रुजवला गेला…

देवीच्या नावानं घरातली एखादी स्त्री सोडणे, जटा असतील तर त्या न कापणे, टोपल्यात देवीचा फोटो घेवुन हळदी कुंकु वाहुन तीच्या नावानं भीक मागणे… हे सर्व त्या काळच्या तथाकथित उन्नत समाजाने इतर समाजावर लादलेली हि प्रथा…

मुळात असं देवीच्या नावानं मागण्याला भीक असं नाव न देता, हे लोक त्याला “जोगवा” असं गोंडस नाव देतात. ते म्हणतात आम्ही आमच्यासाठी मागतच नाही, देवीचा फक्त आदेश पाळतोय..!

यांचं पुनर्वसन करणं तर सोडाच, नुसतं जोगवा मागणं सोडा आणि काम करा हे म्हणणं देखील इथं धारीष्ट्याचं ठरतं… अंगावर येवुन मारायला देखील त्या कमी करणार नाहीत…

तर भवानी पेठेतल्या, भवानी माता मंदिरात अशा किमान ४० आज्ज्या जोगवा मागत बसलेल्या असतात. मागच्या एक वर्षांपासुन मी या आज्ज्यांशी नातं टिकवुन आहे. कामाचं नाव काढुन ब-याचवेळा यांचा मार खाण्याचाही खुपदा प्रसंग आलाय, पण इतर आज्ज्यांमुळे वाचलो… असो… तर दर मंगळवारी इथं मी जातो… औषधं देतो… नाती सांभाळतो… कधीतरी काम करतील या भाबड्या आशेनं… अजुन काहीही पदरात पडलं नाही पण जाणं थांबवलं नाही…

तर असाच एका मंगळवारी गेलो होतो.. सगळ्या जटाधारी आज्ज्यांत तेव्हा मात्र एक पन्नाशीतली मावशी दिसली… ती माझ्याकडे आलीच नाही, अत्यंत शांत चित्ताने पण, कपाळाला हात लावुन कसल्यातरी विवंचनेत ती बसली होती.

मी हाक मारली, “मावशी..!”

तीने तितक्याच शांततेत वर पाहिलं… काही न बोलता जीभ दाखवली… जिभेवर छोटी जखम होती…

मी म्हटलं, “काय झालंय?”

तेवढ्याच शांततेत म्हटली, “कोळसा लावला होता दाताला, त्यात काहीतरी होतं… ते टोचलं असेल..!”

भाषा अत्यंत मृदु… अंगावर कपडे जुने, फाटके पण स्वच्छ… चेह-यावर सात्त्विक भाव… मला लगेच कळलं, ही मुरलेली भिक्षेकरी किंवा जोगवा मागणारी नाही… मला हिच्याशी बोलतांना एक वेगळेपण जाणवलं…

मी बाकिच्यांना औषधं दिली… आणि या मावशीजवळ मांडी घालुन बसलो रस्त्यात तीच्याच लायनीत… तीच्या शेजारी, ती थोडी अवघडली असावी… अंग चोरुन बसली…

म्हटलं, “मावशी, अशी का चिंतेत बसली? अजुन दुसरा काय त्रास आहे का? असेल तर सांग, औषध देतो…”

हळुच माझ्याकडं बघत म्हणाली, “नशिबाचे भोग भोगत्येय त्याच्यावर काही औषध आहे काय?”

आता माझी खात्री पटली, काहीतरी वेगळा रंग आहे…म्हटलं, “नीट सांग की काय झालंय ते? बघु की, नशिबावर पण काय औषध निघतंय का?”

यावर तीच्या चेह-यावर, “तुम्हाला का सांगु?” असे भाव होते…

मी म्हटलं, “सांग की, डॉक्टर आहे मी, मला नीट कळल्याशिवाय औषध कसं देवु? काही तोडगा निघाला तर बधु… आणि मी पण तुझ्या मुलासारखाच की…”

माझं वाक्य पुर्ण होण्या अगोदरच मावशीच्या डोळ्यातुन अश्रुधारा वाहु लागल्या, तीनं पदराखाली तोंड लपवलं… मी सटपटलो… मला कळेना मी काही चुकीचं बोललो का?
शेजारच्या आज्जीकडे मी प्रश्नार्थक नजरेनं पाहीलं… आजी म्हणाली, “आवो तीचं २७ वर्षाचं पोरगं दहा दिवसांपुर्वी मेलं… तुमी मुलासारकं हाय म्हणला म्हणुन तीच्या पोराची तीला आटवन झाली आसंल…”

मी मावशीला शांत होवु दिलं, चहा आणला… हात जोडुन माफी मागितली…

पण तरीही म्हटलंच, “काय झालंय सांग की नीट…”

ब-याच वेळानं मावशी बोलती झाली…

“माझं नाव… XXX, शिक्षण नाही, यजमान प्राथमिक शाळेत शिक्षक होते… पायाने अपंग… पण ठिकठाक सुरु होतं… मुलगा झाला… त्याला वाढवण्यात, संगोपन करण्यात दिवस मजेत जात होते… काटकसर करुन पोट मारुन पोरासाठी बचत करत होतो…”

“पोरगं मोठं झालं… मधल्या काळात यजमानांना पायाचा त्रास वाढला, नोकरी सोडावी लागली… जागेवरच सगळं करणं मला भाग होतं… करतही होते… मी नोकरी करण्याचा प्रयत्न केला पण शिक्षण नाही… मग धुणं भांड्याची कामं करायला लागले…”

“यजमानांच्या डोळ्यात पाणी यायचं… शिक्षकाची बायको… आज धुणंभांडी करत्येय असं म्हणायचे, स्वतःलाच दोष द्यायचे… पण ईलाज नव्हता… पोरासाठी, नव-याच्या औषधासाठी करावंच लागत होतं…”

“पोरावर भरवसा होता, वाटलं शिकेल, तो पण मास्तर होईल… त्याच्या जीवावर जगु… पण नाही… आमच्या नशिबात नव्हतं… इतर पोरांच्या नादानं त्याला दारुची सवय लागली…”

“रोज दारु प्यायचा, ज्या बापानं अपंग असुन पोरासाठी पोट मारुन बचत केली त्याच बापाला पट्ट्यानं मारायचा, पैशासाठी…”

“मी मध्ये पडायची…पण एवढं मोठं पोरगं मला कुठं आवरतंय… मलाही मारायचा.. पैसे घेवुन पळुन जायचा… रस्त्यात दारु पिउन पडायचा, मग मी एकटी बाई रात्रभर शोधत बसायचे रस्त्यावर उकिरडे आणि गटारं…”

“त्यानं दारुपायी घरातलं सगळं विकलं… मी म्हणायचे, आईबापाला पण विक आता आणि पी दारु… तर म्हणायचा, वेळ आली तर ते पण करेन..!”

“मला आठवतंय डॉक्टर, त्याचा वडील लहानपणी त्याला भारीतला बुट घेण्यासाठी चार महिने पैसे साठवत होता… स्वतः स्लीपर शिवाय मात्र काहीच वापरलं नाही… हॉटेलात गेला की पोराला पोट भरुन खावु घालायचा… बील जास्त येईल म्हणुन स्वतः खायचा नाही काहीच… उरलेले पैसे साठवुन ठेवायचा… पोरासाठीच..!”

“त्याच अपंग बापाला हा पडेस्तोवर मारायचा, पैसे काढुन घ्यायचा… आणि तो गेल्यावर मी बसायचे बाम लावुन दुखावलेल्या हातापायांना शेकत… त्यांना म्हणायचे, असु द्या हो… सुधारेल, आपण करु प्रयत्न… नोकरी लागल्यावर, लग्न झाल्यावर सुधारेल… धीर धरा…”

मला हे सगळं ऐकुन राग आला, म्हटलं, “असल्या कार्ट्याला द्यायचं होतं ना पोलीसांत, त्यांनी सरळ केला असता त्याला..!”

मला वाटलं, आता ही माझ्याच बोलण्यात सुर मिसळेल… त्याला शिव्या देईल… पण नाही… शेवटी ती आईच होती…

म्हटली, “खुप लोकांनी आमाला हेच सांगितलं… पण एकुलतं एक लेकरु माझं… मी बरी त्याला पोलीसांचा हात लागुन देईल..?”

“चुकतंय डॉक्टर माणसाचं कधीकधी, आपणच समजुन घ्यायचं… आईबाप असतात कशाला?”

“हाताला जखम झाली तर तुम्ही औषध देता? का डायरेक्ट हातच कापुन टाकता? डोकं दुखत असेल तर उपचार करता? का डोकं कापुन टाका म्हणुन सांगता?”

मी स्तब्ध झालो..!

“अहो, नउ महीने पोटात सांभाळलं… ते काय दुस-याचा मार खावु घालायला?”

“खुप त्रास दिला आम्हाला त्यानं, पण आम्ही म्हणायचो, असु दे… आपलं पोरगं व्यसनाचं पेशंट आहे… दारु हा सुद्धा आजार आहे… आपल्याला त्रास देत्येय ती दारु… पोरगं नाही… आपण दारुशी झगडु, पोराशी नाही… दारुला घराबाहेर हाकलु, पोराला नाही…”

“एखाद्याला टि.बी. झाला, कॅन्सर झाला, एखादा मतिमंद असेल, तो पण वैतागुन घरात त्रास देतच असेल घरातल्यांना, पण म्हणुन घरातले त्याला पोलीसांत देतात? हाकलुन देतात? का टाकुन देतात? नाही ना? मग..?”

“आजाराशी लढायचं असतं डॉक्टर… माणसाशी नाही..!”

“आपला माणुस आजारी असेल, अडचणीत असेल तर त्याला सोडुन जायचं आणि अजुन अडचणीत टाकायचं कि त्याला आपण मदत करायची? माझा पोरगा पण आजारीच होता दारुच्या व्यसनानं..!”

“या आजारातुन बाहेर काढणं हे आईबाप म्हणुन आमचं कर्तव्यच होतं..! ते मी मनापासुन केलं..!”

एका अडाणी बाईचे नव्हे… एका प्रगल्भ आईचे हे विचार ऐकुन माझेही डोळे पाणावले…

“डॉक्टर, पुढं त्याचं लिव्हर खराब झालं, ऍडमिट केलं, अंगावरच्या कपड्यां व्यतिरीक्त सगळं विकलं ट्रिटमेंट साठी आम्ही… पोराच्या दारुशी लढता लढता, आम्हीच हरलो… २७ वर्षांचं पोरगं गमावुन बसलो…”

त्या माउलीनं पदर लावला पुन्हा डोळ्याला…

शांत झाल्यावर म्हणाली, “असुदे, पण जाताना आईबापाची किंमत कळली त्याला… शेवटी शेवटी पाया पडुन म्हणायचा… बाबा, आई… मला माफ करा… बोलताही यायचं नाही त्याला… डोळ्यांतुन आसवं सांडायची त्याच्या आणि आम्ही ती पुसत रहायचो…”

म्हणायचा, “जर मी वाचलो आणि घरी आलो तर पुन्हा नाही असं वागणार…”

पुर्वी म्हणायचा, “घर नावावर करुन द्या…” आत्ता माझ्या हातात असतं तर आम्ही दोघांनी उरलेलं आयुष्यच त्याच्या नावावर केलं असतं…

पुन्हा आवंढा गिळला तीने…

मी पाठीवर थोपटलं तीच्या आणि म्हटलं, “तु इथं कशी?”

“पोरानं दारुत सगळं विकलं… आणि नंतर त्याला वाचवण्यासाठी आम्ही उरलेलं विकलं… होती ती कामं सुटली… आणि आता काम करण्याची उमेद पण गेली..!”

“मग आले देवीच्या दारात…
मला आता जगायची इच्छाच नाही…”

“आता अपंग नव-यातच मुल बघते… त्याचं सगळं करते लहान मुलासारखं…त्याला जगवणार… तो आहे तोवर मी राहणार… तो गेला की मी ही जाणार..!”

कळवळुन बोलणा-या या शब्दांनी मी पिळवटुन निघालो…

म्हटलं, “मावशी खुप सोसलंस तु…”

“डॉक्टर, आई आपल्या लहान बाळाला उचलुन घेते, किती कौतुक वाटतं तीला..?
मी ही माझ्या पोराला उचलुन घेतलं होतं… शेवटचं… अंतिम संस्काराआधी… त्यावेळी… मी… माझं… तो… हे…”

पुढचं बोलुच शकली नाही बिचारी…

आजुबाजुच्या आज्ज्याही चिडिचुप होवुन पदरानं डोळे पुसत होत्या…

इतक्या त्या गर्दित, गोंगाटात मला फक्त ऐकु येत होते… हुंदके… या म्हाता-या माणसांचे… आईपण नीट मिरवु न शकलेल्या त्या आईचे… आणि पोराचा मार खावुन पुन्हा त्याचेच अंतिम संस्कार कराव्या लागणा-या त्या अभागी बापाचे..!

मी भकास नजरेनं देवीच्या कळसाकडे पहात होतो..!

का कोण जाणे, कळसाची चकाकी कुठंतरी झाकोळुन गेल्यासारखी वाटली… कळसाचा ताठपणा कुठंतरी वाकल्यासारखा वाटला…

यानंतरही पुन्हा २ – ३ मंगळवार मी गेलो, गेल्यावर मी या मावशीबरोबर आवर्जुन बोलायचो…

मधल्या काळात हि मावशी कशात रमेल याचा सतत विचार करत रहायचो.

मला नेहमी जाणवायचं, जोगवा देणारं कुणी आलं आणि त्यांच्याबरोबर कुणी लहान मुलं असतील तर हि त्यांना हात लावायला पहायची, बिस्किट देण्याचा प्रयत्न करायची… बोलण्याचा प्रयत्न करायची…

गेलेल्या मुलाचा धक्का तीला जर पचवायचा असेल तर पुन्हा मुलांतच ती रमली असती हे उघड होतं…

हि सायकॉलॉजी गृहित धरुन मी तीच्यासाठी काय करता येईल हे शोधत होतो…

अचानक एका सुरेश शिंदे नावाच्या मित्राने सांगितलं, “डॉक्टर, पुण्याजवळ एका निवासी अंधशाळेत १० – १५ अंध अनाथ मुलं आहेत, यांना सांभाळण्यासाठी, स्वयंपाकासाठी मावशी हवीय…”

मी हरखलो, जे हवंय तेच नेमकं ताटात यावं असं झालं…

ही मावशी काम करणार नाही याची जाणिव होतीच तरीही प्रयत्न करायला काय हरकत आहे, या विचाराने आज नव्या उत्साहात गेलो…

त्याच जागी ती तिथंच बसली होती… भकास… कपाळाला हात लावुन..!

म्हटलं, “मावशी शिक्षकाची बायको तु… जोगव्याच्या नावाखाली भीक मागतेस बरं नाही वाटत गं…”

“काय करु मग? आता फक्त मरणाची वाट बघायची… सांगितलं ना नव-यातच मुल शोधते, त्याच्यासाठीच जगते…
वाटायचं मुलगा शिकला असता, लग्न झालं असतं, नातवंडांना खेळवलं असतं.. पण नशीबातच नव्हतं हो…”

म्हटलं, “तुला नातवंडांना खेळवायचं आहे? त्यांना खावु पिवु घालायचंय स्वतःच्या हातानं? त्यांचं हवं नको बघायचंय? वेणी फणी करायचीय?”

मावशीचे डोळे चमकले अविश्वासाने… भकास चेह-यावर लकाकी आली…म्हटली, “कसं..?”

तीला समजावुन सांगितलं… “बघ, तुझं पोरगं तुला सोडुन गेलं… आणि काही पोरांच्या आया त्यांना सोडुन गेलेत… अशा अनाथ पोरांची आई हो… आजी हो…”

“तुला पोरं आणि नातवंडं मिळतील, आणि त्या पोरांना आई आणि आज्जी…”

“तुझे यजमान शिक्षक आहेतच, एकाजागी बसुन ते या मुलांना शिकवतील…”

“जे तुम्हाला तुमच्या पोराचं करायला जमलं नाही ते आत्ता या पोरांसाठी करा… ही पण तुमचीच आहेत असं समजुन…”

ती कसल्यातरी विचारात गढुन गेली खुपवेळ…

मी तिरक्या नजरेनं तीच्याकडं बघत म्हटलं, “सांग बरं का लवकर, नाहीतर मला काम द्या म्हणणा-या माझ्याकडं ६ -७ मावशा आहेत तयार… त्यांना लावतो तिथं कामाला…
त्या खेळतील मग पोरांत आणि तु बसशील रस्त्यावरच जोगवा मागत… बघ काय पटतंय..!”

ती अजुनही गहन विचारात असावी…

मी ही मग बॅग उचलुन निघायचं सोंग केलं… आणि म्हटलं, “चला मी निघतो बाबा, मलाही खुप कामं आहेत…तुला नकोय तर दुस-या मावशीलाच देतो काम… जावुदे!”

इतका वेळ स्तब्ध असणारी मावशी मी निघाल्यावर स्प्रिंग सारखी उठली आणि माझा हात धरुन अडवत म्हणाली, “मी तयार आहे..!”

“कधी जायचं? कुठं जायचं..? आणि ती मुलं मला आई समजतील ना? सांगा की… बोला की डॉक्टर… घाईत तीला धड बोलताही येत नव्हतं…”

मी म्हटलं, “आई समजतील म्हणजे? तु आईच आहेस… काल एका पोराची होतीस आज दहा पोरांची झालीस… काय खरं का खोटं..”

“होय… होय…” म्हणत डोळ्यांतुन अश्रुंच्या धारा वाहु लागल्या तीच्या…

भकास चेहरा पुन्हा उजळला होता आज… एक आई पुन्हा जन्माला आली होती आज…

तेवढ्यात एक बाई मावशीला जोगवा देण्यासाठी आली…

तीनं तो न घेताच, माझ्याकडं बघत हसत त्या जोगवा देणा-या बाईला म्हणाली… “मिळाला गं माय मला जोगवा!

मी सहज मंदिराच्या कळसाकडं पाहिलं… कळस पुन्हा चमकत होता… तस्साच जसा पुर्वी चमकायचा..!!!

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*