मागच्या आठवड्यात काम संपवुन आज्ज्यांच्या गराड्यात मस्त मांडी घालुन गप्पा मारत बसलो होतो.
त्यांची चेष्टा करत, हसत खिदळत गप्पा मारणं, त्यांच्यातच बसुन खोड्या करणं, हा आयुष्यातला सध्याचा परमोच्च आनंद..!
असाच बसलो होतो, माझ्या हातातला पेन आणि केसपेपरचा कागद एका आज्जीनं हातात घेतला… आणि हाताला चाळा म्हणुन त्यावर रेघोट्या मारत बसली… माझा महत्वाचा कागद होता तो, पण मी तीला अडवलं नाही…
संपुर्ण कागदावर रेघोट्या मारुन झाल्यावर म्हटलं, “म्हातारे, काय हाय हे?”
तर म्हणाली, “वाच की नीट. वाचाय येतंय ना तुला…? का शिकवु मी…?” असं म्हणुन दात पडलेल्या तोंडातुन खुसुखुसु हसत ती म्हणाली…
मी म्हटलं, “वाचाय न्हाय येत मला, तु शिकव की… सांग की काय लिहिलंय…”
माझ्या खांद्यावर तीनं हात ठेवला आणि खालच्या आवाजात कानात म्हणाली, “आरं तुजं नाव लिव्हलंय… नीट बग की..!”
माझ्या डोळ्यात पाणी तरळलं… खरंच प्रेमाला भाषा नसते… लिपी नसते, तीनं ज्या रेघोट्या ओढल्या होत्या तीच तीची “अभिजीत” लिहिण्याची लिपी होती…
नाहीतरी आपली लिपी तरी कशी तयार झालीय? अ ला अ म्हणावं, ब ला ब म्हणावं हे कुणीतरी ठरवलं आणि आपण ते पाळतो, नाहीतर या ही वळणदार रेघोट्याच आहेत की…
तीच्या भाषेत तीनं त्या कागदांत, रेघोट्यात आख्खा अभिजीत बसवला होता… मी त्या कागदाखाली माझं आणि आज्जीचं नाव आणि तारीख लिहीली… आणि हा कागद लॅमिनेट करुन जतन करण्यासाठी बॅगेत ठेवला…
इतक्या सुंदर “हस्ताक्षरात” माझं नाव आयुष्यात पहिल्यांदाच कुणी लिहीत होतं…
नाहीतरी मी तरी कोण? आडव्या उभ्या मारलेल्या रेघोट्याच की..!
इतर बसलेल्या आज्ज्या मावश्या हे सगळं बघतच होत्या… त्या हसायला लागल्या … मला भेटायला आलेल्या चार लोकांनी पण हा कागद पाहिला… ते हसले आणि म्हणाले, “काय आज्जी, डॉक्टर साहेबांचं नाव नाय लिहीलं, उलट तुम्ही त्यांचा महत्वाचा पेपर पण खराब केलात..!”
आज्जी ताड्कन म्हणाली, “कोण सायेब हाय हितं? त्यो तालेवार आसंल तर भाईर, हित्तं माजा पोरगा हाय त्यो… त्याज्या कागदाला मी काय बी करीन..!”
“कागदावर नसंल आलं मला लिवायला पन त्याजं नाव मी माज्या काळजावर लिवलंय…”
मला भरुन आलं… मला इतकं कुणी “माझं” समजतंय…? माझ्यावर इतकं कुणी हक्क गाजवतंय? काळजात मला जागा देतंय?
कुणाच्या मते काही असो, पण या आज्जीनं, या कागदावर रेघोट्या ओढुन मला जाणिव करुन दिली, आपण सगळे उभ्या आडव्या रेघोट्याच आहोत कागदावरच्या… आपलं खरं आस्तित्व असते ते एखाद्याच्या मनात आपली असलेली प्रतिमा..!
असो, इतरांनी उडवलेली खिल्ली पाहुन आज्जी नाराज झाली, आपली जागा सोडुन दुसरीकडं जावुन बसली…
मी तीच्या जागेवर पुन्हा गेलो, तीला म्हटलं, “तु जे माझं नाव लिहिलंयस ते मला आवडलं आणि मी ते जपुन ठेवणार आहे, जे तुझ्यावर हसले ते येडे आहेत…”
यावर ती शुन्यात बघत म्हणाली, “बापा, तुमाला तुमच्या आयबापानं शिकवलं… आमच्या आयबापानं आमाला नाय शिकवलं आमचा काय दोश…? शिकलो आस्तो तर आमी बी सायबीणीसारक्या नसतो का -हायलो? भिक मागायची हौस हाय का आमाला? कुत्र्यावानी लोकं हाड हाड करुन हाकलुन देत्यात… आमाला बरं वाटतंय का? पन करावं लागतंय बापा… पोरगं मेलंय… येडसनं… (एड्स)… सुनंला बी येडस, किती दिस जीत्ती -हाइल देवाला ठाउक… तीज्या पदरी योक ल्योक हाय… त्याला येडस न्हाय… त्या माज्या नातवासाटी मी मागाय बसती… त्याला साळंत घातलाया… त्याला म्हनलं, बाबा तु सायेब हो, आमच्या डाक्टर सारका… आन गरीबाची शेवा कर… त्यो बी म्हनलाय, व्हय मी डाक्टर हुनार आन् आडलेल्यांची शेवा करनार…”
आज्जीच्या नजरेत मी साहेब होतो, तिच्यासाठी मी रोल मॉडेल होतो…तीच्या नातवाला ती माझ्यासारखंच बनवु पहात होती… कुठलाही पुरस्कार मला फिका आहे यापुढे…
मला अभिमान आहे माझ्या कामाचा…
लोकं म्हणतात आपल्या मुलाला… “तु अमिताभ हो… आमिर खान हो… सचीन तेंडुलकर हो… सानीया मिर्झा हो…”
माझी खात्री आहे… कुठलाही पप्पा सांगणार नाही आपल्या मुलाला की, “तु भिका-यांचा डॉक्टर हो…” कुठलीही मम्मा सांगणार नाही आपल्या डॉलीला… “तु Doctor for Beggars हो…”
पण या माझ्या निरक्षर,अडाणी, येड्या म्हातारीनं आपल्या नातवाला सांगितलंय… “तु शीक, डाक्टर हो… आन् गरीबाची शेवा कर…” तीच्या या वाक्यानं मी भरुन पावलो..!
या आज्जीची मुळ पार्श्वभुमी अशी… हिचा मुलगा एड्स ने वारला… सुनेलाही लागण झालीच आहे… मुलगा पाचवीत आहे यांचा, सुदैवाने तो नॉर्मल आहे… आजीचं वय ८५ असावं… पान पिकलंय कधी गळुन पडेल माहित नाही…
नाइलाजाने हिची सुन दुस-या मंदिरात भिक मागायची… अर्थातच तीला HIV – AIDS !
रिपोर्टस् अत्यंत वाईट आहेत, आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर आहे…
मी तीला चार महिन्यांपुर्वी वजनकाटा दिला होता, म्हटलं होतं भिक नको मागु, कष्ट तुला होणार नाहीत, वजनकाटा घेवुन बैस… येतील ते पैसे घे…
आनंदाने ती तयार झाली होती… वजनकाटा घेवुन बसायची… भिकेपेक्षा वजनकाट्यावर पैसे जास्त मिळायचे… ती खुष आणि म्हणुन मी ही खुष…
बरेच दिवस भेटली नाही, पण मागच्या महीन्यात भेटली तेव्हा पुन्हा भिक मागतांना दिसली, म्हटलं, “काय गं…? इथं कशी परत?” तर म्हणाली, “वजनकाटा काढुन घेतला जबरदस्तीनं येकानं..! मग काय करणार आले हितं पुना भिक मागायला…”
म्हटलं, “काढुन घेतला? घेवु दे… दुसरा देतो, पण तु पुन्हा भीक नाही मागायची…”
म्हणाली, “नको डाक्टर, आता नको काटा… चार सहा महिन्यात जायचंच आहे… वाया जाईल काटा..!”
म्हटलं, “कुठं जायचंय…?”
“मी आता येडस नं मरणारच हाय डाक्टर… माज्या पेशी कमी झालेत, माजा भरवसा न्हाय, कशाला काटा वाया घालवता?”
“क्काय, अगं काय बोलते? येडी आहेस का तु? तुला काहीच होणार नाही…” मी आवंढा गिळत म्हटलं…
“गपा डाक्टर, तुमालाबी म्हायीत हाय… मी काय राहनार न्हाय..!”
माझ्या डोळ्यात पाणी तरळलं… पण तीचे डोळे मात्र कोरडे ठणठणीत… दुष्काळातल्या ओढ्यासारखे…!
“तुमी कशाला रडताय डाक्टर? आता बगा, मी माज्या सासुची सोय लावणार… आन् पोराला पन सांगितलंय, मी सहा महिन्यात जानार म्हनुन, मी गेल्यावर कसं वागायचं हे बी त्याला सांगितलंय…”
मी त्याला सांगीटलंय, “मी मेल्यावर तुला काय आडचन आली तर तुजी आज्जी जिवंत आसंल तर तीला सांग, न्हायतर आपल्या डाक्टरला सांग… बाकी कुणाजवळ काय मागु नको, शाळा शीक, मोटा हो, भिक नगो मागु..!”
आईग्गं… मी हे ऐकताना शहारलो… अंगावर काटा आला माझ्या तेव्हा ऐकतांना, आणि आत्ता लिहितांनाही..!
आपसुक माझ्या डोळ्यातुन पाणी वहायला लागलं, म्हटलं… “तु हे बोलतेस… तुला मरण्याची भिती नाय वाटत? लोकं किती घाबरतात मरणाला..!”
“भिती कशाची? आवो… लोकं फुडल्या दहा वर्षांचं नियोजन करत्यात आन् फाटदिशी मरत्यात, त्यानला म्हाईत पन नसतंय, आपुन मरनार म्हनुन…”
“माजं बरं हाय, मला कळल्यामुळं मी सासुचं, पोरांचं आन् माजंबी मन तयार केलंय… नियोजन केलंय… ज्याला आपलं मरन कळत न्हाई त्यो नियोजन करंल का? मला निदान नियोजन तरी करता आलं…” भकास नजरेनं आभाळाकडं पहात ती म्हणाली होती..!
आपलं मरण कशात आहे, कधी आहे… हे कळुनही एखादी व्यक्ती इतकी स्थितप्रज्ञ राहु शकते? नियोजन करु शकते?
आयुष्याच्या अंतिम टोकावर ती उभी होती… आणि तरीही धीरानं तोंड देत होती…
मी गपगुमान उभा होतो…
मी कसंबसं हे सगळं पचवण्याचा प्रयत्न करत होतो… मी काही न बोलता तीची नजर चुकवुन निघालो होतो…
तरी जातांना म्हणाली, “डाक्टर, माज्याकडं चार कप आन् सहा बशा असलेला चहाचा सेट हाय,.. तुमाला दिवु का आनुन? वापराल का घरी…? मला येका बाईनं दिला हुता… सहा कप हुते… पन दोन पोरानं फोडले…”
मी चाचरत म्हटलं… “का? राहु दे की तुला…”
पुन्हा तेच भकास हसु चेह-यावर आणुन म्हणाली, “नगो, पोरगं त्या कपातच मला चहा मागतंय… जेवतंच न्हाई… मी बी करुन देते त्याला… मागंल तवा… दिसातनं पाचवेळा चहा पेतंय…”
मी मेल्यावर कप बगुन माजी आटवण त्याला येईल… आन् पाचवेळा चहा त्याला कोन करुन दिल?
घरातनं कप भायेर काडलं तर माजी आटवन तरी त्याला येनार न्हाई…
हे बोलता बोलता, दुष्काळातला ओढा आता इतक्या वेळानंतर पुरागत वाहु लागला…
“कस्सं राहील वो डाक्टर, माजं पोरगं माज्या म्हागारी सांगा की वो…” माझ्या खांद्यावर डोकं आपटुन, हंबरडा फोडुन विचारलेल्या या प्रश्नावर मी पुतळ्यागत उभा असतो…
मी कसाबसा निघतो…
पाठमोरं असतांना तीची हाक कानावर येते…
“डाक्टर…” ती हाक ऐकुन मी थांबतो …
ती म्हणते… “डाक्टर माज्या सासुचा लय जीव हाय तुमच्यावर… तीला मरुस्तवर औशद द्या… मी आसंल नसंल…”
मी “हं…” म्हणत पुन्हा चेहरा लपवतो… वाहणारे माझे डोळे दिसु नयेत म्हणुन…
“माज्या सासुची लय इच्छा हाय, तीच्या नातवानं शिकावं म्हणुन… भीक मागु नाय म्हणुन..! पन माजं पोरगं आता साळंत जायाचं न्हाई म्हणतंय…”
म्हटलं, “का?”
“आवो, पुस्तक वह्याला पैशे न्हाईत… बाकीची पोरं शाळेत भारीतल्या पिशव्या घेवुन येतात… त्याला पिशवी नाही दप्तराला..!”
मी आज पुन्हा त्या आजीला भेटलो… पाचवीची वह्या, पुस्तकं आणि नवीन सॅक घेवुन…
म्हटलं, “म्हातारे बग तुला काय आणलंय…”
म्हातारी हरखली … गडबडीनं सॅक उघडुन पाहीली… वह्या पुस्तकं…?
चेह-यावर मोठ्ठं प्रश्नचिन्ह…
“हे तु मला आणलंय?” तीचा निरागस प्रश्न…!
मी म्हटलं… “तुला न्हाय तुज्या घरातल्या बारक्या डाक्टर साटी…!”
सगळा उलगडा झाला असावा तीला, उठली आन् गालावर हात फिरवुन कडाकडा बोटं मोडली..!
एकेका पुस्तकावर तीचा हात फिरत होता कौतुकानं… मी म्हटलं, “चल, जावु आता?”
म्हटली, “नीट जा, पाउस येईल आत्ता…” मी “हो…” म्हणुन गाडीला किक मारली… तेव्हढ्यात लगबगीनं पुन्हा गाडीजवळ आली आणि म्हणाली… “मी त्यादिशी तुजं नाव कागदावर न्हाय लिवु शकले पन माजा नातु तुजं नाव कागदावर लिव्हंल…”
मी म्हटलं, “कागदावर नको, तुज्या काळजावरच पायजे मला माजं नाव…”
यावर “व्हय रं बापा” म्हणुन माझ्या गळ्यात पडली…
जातांना हळुच म्हणाली… “माजी सुन तुला कपबशी बद्दल काय बोलली का..?”
मी म्हटलं, “हो… मला ती म्हटली तुमी घेवुन जा कपबशी…”
ती गालात हसली आणि माझा हात हातात धरुन म्हणाली… “बापा, माजा नातु मंजी माजा कप आन् माजी सुन माजी बशी मला जमतंय तवर मी सांभाळीन कप पण आन् बशी पण… मी त्यांची ताटातुट होवु देणार न्हाय मी मरुस्तवर…”
मी पाठमो-या म्हातारीच्या जिद्दीला सलाम केला…
मी ही मग ओरडुन दुरुनच सांगितलं, “ऐ, म्हातारे, आणि मी पन तुला मरु देनार न्हाय लवकर… जोवर कपबशी तुज्या हातात हाय”
Leave a Reply