एक होती चिमणी, नाजुक…छान ! हिचे आईवडिल लहानपणीच वारले. बहिण भाऊ कुणीच नाही…
कालांतराने एका चिमण्या बरोबर तीचं लग्न लागलं. दोघांनी मिळुन काडी काडी जमवुन एक घरटं बांधलं… काटकसरीनं का होईना चिमणा – चिमणीचा सुखानं संसार चालु होता.
चिमणा रोज दाणा पाणी मिळवण्यासाठी दिवसभर फिरुन कष्ट करायचा… चिमणी मागं घरटं सांभाळायची..!
ठिक ठाक चाललं होतं…
चिमणा चिमणीला तसं पाहिलं तर कुणीच नव्हतं… ना नात्यातलं ना गोत्यातलं… चिमण्याला चिमणीचा… अन् चिमणीला चिमण्याचाच काय तो आधार..!
दोघांनाही खुप वाटायचं… आपल्या घरात पण एक छोटं पिल्लु असावं… दोघांव्यतिरीक्त कुणी आणखी तिसरं असावं… त्याच्या इवल्याशा चोचीत घास भरवावेत… चिवचिवाट करुन पिल्लानं घरटं डोक्यावर घ्यावं… आणि आपण ते डोळे भरुन पहावं…
पण… पण… का कोण जाणे, त्यांची हि ईच्छा कधीच पुर्ण झाली नाही…
या एकाच गोष्टीची खंत दोघांनाही आयुष्यभर छळत राहिली… जाळत राहिली… विशेषतः चिमणीला जास्त..!
दिवस सरत होते… चिमणी मनातुन कुढत होती, आयुष्यात कुणीच सख्खं उरलं नव्हतं… किमान स्वतःचं पिल्लु तरी असावं एव्हढीच माफक अपेक्षा… पण ती ही पुर्ण होत नव्हती… चिमणा खुप समजावुन सांगायचा चिमणीला… पण उपयोग नसायचा…
दिवस पुढे पुढे पळत होते, या दोघांनाही मागं टाकुन…
एव्हढ्या मोठ्या रानात आजुबाजुला इतर घरटी पण होती… पण सगळ्या गर्दित हे दोघे मात्र एकटेच…
उमेदीचं वय निघुन गेलं… जाताना भेट म्हणुन म्हातारपण देवुन गेलं… एकटेच जगा असा निःशब्द शाप देवुन गेलं..!
चिमणा आता थकला होता म्हातारपणामुळं, आणि चिमणीही..!
चिमण्याला आताशा काही काम होत नव्हतं… पंख थकले होते… पायात त्राण नव्हतं… मिळेल त्यात भागवत, एकमेकांना सावरत, एकमेकांना आवरत दोघंही जगण्याची लढाई लढत होते… न हरता..!
एके दिवशी चिमणा अन्न शोधायला बाहेर निघाला घरट्यातुन… जातांना चिमणीला त्या दिवशी आवर्जुन म्हणाला… “काळजी घे स्वतःची…” म्हातारी चिमणी मनातुन चरकली… म्हणाली, “आज असं काय बोलताय?” चिमणा तीचा हात हातात घेवुन म्हणाला, “आयुष्यात कधीच काही देवु शकलो नाही तुला… सुखसमृद्धी तर नाहिच नाही… पण एक पिल्लु ही तुझ्या पदरात टाकु शकलो नाही मी… माफ कर मला… करशील ना…?”
चिमण्याला हुंदका आवरेना… घराबाहेर पडवेना… चिमणी हळुच जवळ आली, तीने वृद्ध चिमण्याचा हात हातात घेतला, म्हणाली… “पदर रिकामा कुठंय माझा…? तुमच्या प्रेमानंच पदर माझा काठोकाठ भरलाय हे काय कमी आहे?”
“आयुष्यभर साथ दिलीत, पडले तर हात दिलात… मी संपुर्ण सुखी आहे, आनंदी आहे, समाधानी आहे…”
यानंतर घरट्यातुन कितीतरी वेळ चिमणा चिमणीचे हुंदके ऐकु येत होते… बोलत कुणीच नव्हतं, पण हजार शब्दांना जे जमणार नाही ते एका हुंदक्यात साठलं होतं…
एकमेकांच्या अश्रुत दोघांचेही म्हातारे पंख भिजुन गेले..!
खुप वेळानं, चिमणी हातातुन हात सोडवत, पदर हातात घेवुन म्हणाली, “आता फक्त अजुन एकच दान या पदरात टाका… मला कधीच एकटीला टाकुन कुठं जावु नका… शेवटपर्यंत… मरेपर्यंत सौभाग्यवती म्हणुनच मला राहु द्या… द्याल ना हे दान मला? बोला ना, गप्प का…?”
चिमण्यानं निष्प्राण डोळ्यांनी चिमणीकडे पाहिलं, तीच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर चिमण्याकडं नव्हतं…
आपला सुरकुतलेला थरथरता हात त्यानं चिमणीच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाला… “सुखी रहा..!!!”
चिमणी सुखावली, म्हणाली, “तुम्ही सोबत असाल, यातच माझं सुख आहे, तुम्ही सोबत रहाल ना कायम?”
चिमणीच्या प्रश्नाला उत्तर द्यायला चिमणा होताच कुठं…? चिमणा केव्हाच भुर्र उडुन गेला… परत कधीही न येण्यासाठी…
चिमणी टाहो फोडुन चिमण्याला प्रश्न विचारत राहीली… हातात हात घेवुन तो परत येईल या आशेनं मुक हुंदके देत राहीली… पण चिमणा त्यादिवशी चिमणीला एकटीला सोडुन गेला तो गेलाच… परत आलाच नाही..!
आता चिमणी ख-या अर्थानं एकटी पडली…
रानातले “डोमकावळे” आता जागे झाले… या कावळ्यांनी एकट्या पडलेल्या म्हाता-या चिमणीला टोचा मारायला सुरुवात केली… त्यांना तीचं काडीकाडीनं बनवलेलं घरटं हवं होतं…
चिमणी या डोमकावळ्यांशी आधी लढली… मग रडली आणि नंतर कोलमडली..!
निगरगट्ट “काळ्या” कावळ्यांनी तीला घरातुन हुसकुन लावलं…
चिमणीचा एकुलता एक आधार… तीचं घरटं, ते ही गेलं…
आता चिमणी आली रस्त्यावर…
कुणाच्याही अंगणात पडलेले दाणे चोचीत घ्यायचे… त्या दिवसाचं पोट भरायचं… जागा मिळंल तीथं अंग टाकायचं…
भोगलेल्या यातनाच इतक्या भयंकर की शरीर निगरगट्ट झालेलं,… उन वारा पाउस कशा कशानंही त्रास व्हायचा नाही… मन तर त्याहुन बधीर… सुख आणि दुःख दोन्ही सारखंच..!
दुस-याच्या अंगणात दाणे वेचतांना कुणी हुसकुन लावायचं, कुणी शिव्याशाप द्यायचं… कुणी दगड मारायचं तर कुणी टोमणे… दगडापेक्षा हे टोमणेच लागायचे जास्त… पण करणार काय, भुकेला “लाज” नसते..!
चिमणी आभाळाकडं बघायची… चिमण्याच्या आठवणीनं धो धो रडायची… पण तीचे डोळे पुसायला वेळ होताच कुणाकडं…?
आणि म्हणुन देवाकडं रोज रोज मरणाचं दान मागत बसायची…
जग चालविणारा जो कुणी असेल, तो या अशा शापीत चिमण्यांना जन्माला का घालतो?
माणसानं आस्तिक असावं की नास्तिक? मला वाटतं, माणसानं या ही पेक्षा वास्तविक असावं…!
तर, ही चिमणी एक दिवस माझे मित्र श्री. भापकर, नगरसेवक तथा स्थायी समिती अध्यक्ष खडकी (९३२५७ ९०९११) यांना दिसली… पंख तुटलेल्या असहाय चिमणीला पाहुन, पहाडासारख्या या कणखर माणसाला पाझर फुटला…
त्यांनी मला फोन केला, “डॉक्टर पंख तुटलेल्या या माऊलीला पंख द्यायचे आहेत…बघा कायतरी…” एव्हढं बोलुन फोन कट्… पुढचं बहुतेक बोलुच शकले नसावेत ते..!
मी या जर्जर चिमणीला भेटलो… शुन्य नजर, भकास चेहरा आणि मेलेलं मन… ती काही बोलेचना…
तीच्या वेदनांवर माझ्याकडं कुठलंही औषध नव्हतं,.. डॉक्टर असण्याची लाज वाटली मला..!
कशीबशी जेमतेम माहीती कळल्यानंतर, मला तीची दुखरी नस जाणवली आणि मी ती बरोब्बर पकडली…
हातात हात घेवुन मी तो जादुचा शब्द वापरला… “आई…”
तीचा चेहरा झरझर बदलला… ती अविश्वासानं पाहु लागली… त्यात कौतुक होतं, प्रेम होतं, माया होती…
आई, या एकाच शब्दानं जादु केली…
इतकं फास्ट काम करणारं जगातलं दुसरं औषध मला माहिती नाही…
मी तीचा हात हातात घेतला आणि म्हटलं, “आई, आजपासुन तु माझी आई, इथुन पुढची तुझी सर्व जबाबदारी माझी… मला पोरगा म्हणुन स्विकारशील…?”
आयुष्यभर ज्या गोष्टीसाठी झुरली, ती गोष्ट अचानक पुढं आल्यावर ती भांबावली… तीचा विश्वास बसेना… शब्द सुचेना… त्… त्… प्… प्… करायला लागली… मला तीची ही अवस्था बघवेना… मी सरळ तीला माझ्या छातीशी धरलं..!
यानंतर जे घडलं… ते इथं शब्दांत मांडण्यास मी असमर्थ आहे… पण पहायला साक्षीदार म्हणुन कोसळणारा पाउस होता आणि सोबत आमचे हुंदकेही…
सहज आभाळाकडं लक्ष गेलं… एक पक्षी आमच्या डोक्यावरुन घिरट्या मारत होता… हा त्या आजीचा चिमणा तर नसावा…? माय लेकरांची भेट पाहणारा… मुल हवंय म्हणत तडफडुन गेलेला… अतृप्त आत्मा तर नसावा…?
माहित नाही…
या वृद्ध चिमणीला आता स्वतंत्र आणि स्वतःचा आसरा देणार आहे…
माझे गुरुबंधु डॉ. अविनाश वैद्य सर (९८३४७ ४५५३८) हे चालवित असलेल्या एका वृद्धाश्रमात या माऊलीची सोय शुक्रवार दि. २९ जुन २०१८ पासुन करणार आहोत…
इथुन पुढं कुणाच्याही अंगणात आता ही माऊली जाणार नाही भिक मागत… सन्मानानं जगंल…
या माऊलीस अत्यंत सन्मानानं कार मधुन या वृद्धाश्रमात घेवुन जाण्याचा विचार आहे..!
शुक्रवारी पुन्हा भेटण्याचं आश्वासन देवुन मी निघालो… मागुन हाक आली, “बेटा, तु इतकं करतोयस माझ्यासाठी…मी तुला काय देवु?”
मी म्हटलं, “तु आई माझी… पोरगा म्हणुन स्विकार केलास माझा… याहुन मोठं मला काहीच नाही…!”
ती म्हणाली, “काय तरी घे…”
म्हटलं, “काय देशील आता?”
म्हणाली, “तु माग…”
म्हटलं, “तुझे पंख दे…”
“अरे बेटा, तुटलेत हे पंख, तुझ्या कामाचे नाहीत ते…”
म्हटलं, “माझे नविन पंख तु घे, तुझे जुने पंख मला दे… ज्या पंखांनी तुला इथवर आणलं, त्याची किंमत खुप आहे माझ्यासाठी… या पंखांवरती मी जग जिंकेन..!”
“तुटलेल्या पंखांनी जग कसा जिंकशील?” तीचा भाबडा प्रश्न..!
म्हटलं, “आज तुझा मुलगा म्हणुन नवीनच जन्म झालाय माझा… तुच माझी आई आणि तुच माझं जग..!”
“आता दुस-या कुठल्याही जगाला जिंकायची गरजच नाही मला..!”
“खरंय बेटा” म्हणत ती पुन्हा माझ्या गळ्यात पडली आणि मी त्या जुन्या तुटलेल्या पंखांवरुन हात फिरवत राहिलो… कितीतरी वेळ..!
Leave a Reply