सायब्या…

असेल हि घटना दिड दोन वर्षापुर्वीची..!

स्टेथोस्कोप घेवुन नेहमीप्रमाणेच रस्त्यावर भिक्षेकरी तपासत होतो, औषधं देत होतो… अशात एक धडधाकट माणुसही गर्दीत भीक मागतांना दिसला. पण हा सरावलेला नव्हता… मागं मागं राहुन कुणी काही दिलं तर घेत होता.

डोक्यावर उपरणं घट्ट बांधलं होतं… चेहरा त्याच उपरण्यानं पुर्ण झाकला होता… दिसण्यापुरते डोळे फक्त उघडे ठेवले होते… चालतांनाही अडखळत होता, मला आधी वाटलं कदाचीत हा “प्यायला”असेल…

शर्ट मळलेला, पँटचा रंग विटलेला आणि जास्त मळलेलं कोण याची शर्टशी स्पर्धा करणारा… एक चप्पल तुटलेली..!

ब-याच वेळानं माझ्याकडं आला म्हणाला, “डॉक्टर डोळ्याचा ड्रॉप आहे का?”

म्हटलं, “त्रास काय आहे?”

“दिसत नाही…”

बघीतलं तर दोन्ही डोळ्यात पिकलेला मोतिबिंदु…

अशा लोकांना नीट दिसतच नाही… डोळे असुन नसुन सारखेच…

अच्छा म्हणजे, हा म्हणुन अडखळत होता चालतांना… प्यालेला नाही.

मी म्हटलं, “तोंडावरचं कापड काढा… डोळे तपासु..!”

म्हणाला, “तपासा असंच…”

शेवटपर्यत त्याने चेहरा दाखवलाच नाही… मी तसंच तपासुन म्हटलं, “ड्रॉपने काही होणार नाही, ऑपरेशन करावं लागेल…”

त्याचा हिरमोड झाला…

त्यावेळेला मी डोळ्यांच्या तपासण्या किंवा मोतिबिंदु ऑपरेशन वैगेरे करवुन घेणे सुरु केलेलं नव्हतं…

तो निघाला वैतागुन…

पाठमोरा जातांना मी म्हटलं, “भाऊ डोळे सोडले तर बाकी तब्येत चांगली आहे तुमची, इथं भीक मागणं बरं नाय… म्हाता-या माणसाचं मी समजु शकतो..!”

निघालेला तो… गर्रकन् वळला… माझ्या अगदी जवळ येवुन म्हणाला, “भरल्या पोटी दुस-याला अक्कल शिकवायला सोप्पं असतं डॉक्टर… फुकट सल्ला कुणी मागितला नाही तुम्हाला, ड्रॉप आहे का तेव्हढं विचारायला आलो होतो, तुम्ही तुमचं काम करा, दुस-याच्या भानगडीत पडु नका…”

चेहरा झाकलेला होता, पण त्याचा राग त्यातुनही मला स्पष्ट जाणवला..!

मला या झाकलेल्या चेह-यामागचा खरा चेहरा जाणुन घ्यायची उत्कंठा वाढली…

शुद्ध भाषेवरुन हा थोडंफार शिकला असावा, हे निश्चित होतं… मग असं काय घडलं असेल, ज्यामुळे हा इथं ओळख लपवुन भीक मागतो?

काहीवेळा, “प्रश्न” सोपेच असतात, पण त्याची “उत्तरं” मात्र अवघड..!

घरच्या अंगणात लावलेल्या संगमरवराने घर सुशोभित होतं, पण या घरात मातीचा सुगंध येत नाही मग… किती पावसाळे आले गेले तरी इथली माती “कोरडीच” राहते… ती कधीच “भिजत” नाही..!

असो, मी या व्यक्तीला टार्गेट करायचं ठरवलं. मुद्दाम कारणं काढुन ओळख वाढवली, मैत्री निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला याने काहीच प्रतिसाद दिला नाही… तसतशी माझी उत्कंठाही तेव्हढ्याच तीव्रतेने वाढत गेली… बरोब्बर पाच महिन्यानंतर याने चेह-यावरचं कापड काढलं… आणि त्या दिवशी मला त्याचा “खरा चेहरा” पहायला मिळाला..!

स्वतःच्या तीन टेम्पोंचा हा मालक, हाताखाली तीन ड्रायव्हर… घरी सुस्वभावी सुसंस्कारी पत्नी, दहावी बारावीत शिकणारी दोन मुलं… मस्त चाललं होतं..!

पण… अचानक सख्ख्या भावाने फसवुन सगळं हडप केलं… एका रात्रीत हे कुटुंब रस्त्यावर… गबर भावापुढे याचं काहीच चाललं नाही… कागदोपत्री इतका पद्धतशीर डाव टाकला होता की, कायद्यानंही त्याच भावाला कौल दिला होता !

जगायचं कसं..?

पत्नीने मग चार घरी पोळ्या करण्याची कामं सुरु केली… एके काळची “मालकीण” आता “स्वयंपाकीण” म्हणुन काम करायला लागली… आपण जगायचं, पोरांना जगवायचं तर हे करणं भागच होतं..!

यानेही मग एका ठिकाणी टेम्पो ड्रायव्हर म्हणुन काम स्विकारलं… पण नियतीला हे सुद्धा पसंत नव्हतं… याला हळुहळु दिसायचं कमी आलं… होती ती ड्रायव्हिंग ची नोकरी पण गेली…

मग याने टेम्पोतुन माल उतरवणारा हमाल म्हणुन काम सुरु केलं… पण नीटस दिसत नसल्यामुळे पाय-या दिसायच्या नाहीत, कित्येकदा पायरी चुकल्यामुळं अंगावर पोती घेवुन पडायचा..!

आयुष्याची एक पायरी घसरल्यामुळं, आख्खं आयुष्यच अंगावर येवुन कोसळलं होतं… पोत्याचा भार आणि मार त्यामानानं कमीच होता..!

कित्येकदा वाटायचं, आयुष्य संपवुन टाकावं… पण मग दिसायचे, त्याच्यावर अवलंबुन असणारे तीन जीव… पत्नी आणि दोन मुलं..!

हा आतल्या आत रडायचा… मुक्या हुंदक्यांची गाणी गायचा… या गाण्याला साथ आणि संगत होती ती “टोमण्यांची”… ढोलकीसारख्या रोज “थपडा” खायचा इकडुनही आणि तिकडुनही…
पेटीच्या भात्याप्रमाणे “श्वास” घुसमटला तरी गात रहायचा… सतारीच्या सगळ्या तारा तुटल्या असुनही, सतारीची “तार” शोधत रहायचा… भुकेच्या तालावर गाणं अजुन “रंगत” जायचं…
आणि भरलेल्या या मैफिलीत, “गाणं” ऐकणारा कुणी “दर्दी” भेटेल का ते शोधत रहायचा..!

असंच आयुष्याचं गाणं गात गात शेवटी या वळणावर विसावला होता, ओळख लपवुन भीक मागत होता, अत्यंत नाईलाजाने… पोरांसाठी… बायकोसाठी..!

“मी भीक मागतो हे मुलांना माहित नाही हो डॉक्टर… कामाला जातो असं सांगुनच मी घर सोडतो… रोज माझ्या पोरांशी मी खोटं बोलुन इथं येतो…” हे सांगतांना तो असा काही कळवळला होता की… चेहरा जर कागदाचा असता तर तिथल्या तिथंच त्याचे हजार तुकडे झाले असते..!

गळ्यात पडुन रडताना मला म्हणाला, “डॉक्टर मी षंढ आहे, खोटारडा आहे…”

मी म्हटलं, “नाय रे गड्या, तु एक “बाप” आहेस..!”

“पोरांसाठी स्वतःचं आस्तित्व विसरणारा…
अंगावर पोती पाडुन घेणारा…
दिसत नसतानाही काम करण्याची धडपड करणारा खरा “मर्द” आहेस…”

यानंतर तो अन् मी बोलत राहिलो बराचवेळ… बिनशब्दांचं..! त्याचे हुंदकेच आता शब्द झाले होते… आणि एका झगडणा-या बापाची ती कविता मी ऐकत राहिलो…

खरंच एकेकाकडे किती दुःख आणि वेदना असु शकतात?

जर या दुःखांना आणि वेदनांना काही “किंमत” असती तर..? दुःखी माणुस सर्वात जास्त “श्रीमंत” म्हणुन गणला गेला असता..!

“डोळ्यानं दगा दिला हो डॉक्टर, नाहीतर मी अजुन हरलो नाही…” या त्याच्या वाक्यानं मी भानावर आलो.

म्हटलं, “दिसायला लागलं तर करशील पुन्हा काम? भीक मागणं सोडुन देशील?”

त्याने पोरांची शप्पथ घेवुन मला वचन दिलं…

बस्स, हिच ती वेळ आणि हाच तो प्रसंग, ज्यामुळे माझ्याही मनात ठिणगी पेटली…

केवळ याच प्रसंगामुळे डोळ्यांच्या तपासणी आणि ऑपरेशनला मी सुरुवात केली होती एक वर्षांपुर्वी…

भिक्षेक-यांच्या डोळ्यांच्या ऑपरेशनची सुरुवात करण्यामागे हीच व्यक्ती खरंतर माझी प्रेरणा ठरली…

या एकाचंच ऑपरेशन करुन देणार म्हणता म्हणता, आज १०१ लोकांची ऑपरेशन करुन बसलो… याचं श्रेय खरंतर याचंच..!

ऑपरेशन नंतर याला व्यवस्थित दिसायला लागलं…

बारीक काड्यांचा सोनेरी चष्मा याने निवडला होता… नाकावर हा चष्मा लावुन तो माझ्याकडं पहायचा… तेव्हा मलातरी तो साहेबच वाटायचा… आणि मी खरंच याच्याकडे भावी “साहेब” म्हणुनच पहात होतो…

तेव्हापासुन मी याला “साहेबसायब्या” असंच म्हणायचो… याच्या पत्नीशीही माझी आता चांगली ओळख झाली होती.

यानंतर त्याच्यासाठी काम पहायला सुरुवात केली…

कोकणांत संपुर्ण कुटुंबाची व्यवस्था करुन फार्म हाउस सांभाळणं असेल, मुंबईतल्या एका बंगल्यावर केअर टेकर म्हणुन असेल अशी बरीच कामं त्याला मिळवुन दिली, पण मुलांचं शिक्षण आणि इतर काही अडचणी यामुळे ही कामं त्यांना जमली नाहीत.

ड्रायव्हिंग करण्याचा उत्साह आणि आत्मविश्वास आता गमावला होता… नाहीतर ड्रायव्हर म्हणुनही खुप ऑफर्स याला आल्या होत्या…

मग भाजीपाला विकण्याचा व्यवसाय घालुन दिला… पण सगळं तोट्यात गेलं…

मटकी विकतो म्हणाला म्हणुन, त्याही व्यवसायात मदत केली, तीथंही तोटा…

पावसाळ्यात कणसं भाजुन विकतो म्हणाला… ते ही करुन बघीतलं… पण जमलं नाही…

कोण कुणाची परिक्षा घेतंय हेच कळंत नव्हतं..!

खरंतर आता मीच नाउमेद झालो होतो..!

मी म्हणायचो, “यार सायबा… कसं रे आपल्याला कशातच यश येत नाही?”

म्हणायचा, “जावु द्या सर, मीच अपशकुनी आहे… भीकच मागायचं नशीबात असेल माझ्या, तर तुम्ही तरी काय करणार..?”

एकदा पुण्यातल्या मेट्रो साठी लेबर हवे आहेत अशी पेपरमध्ये जाहिरात वाचली… गेलो, सुपरवायझरला भेटलो… हात जोडुन काम देण्यासाठी गा-हाणं घातलं… सुपरवायझर देव माणुस निघाला… म्हणाला, “द्या पाठवुन..!”

आमच्या या “सायबाला” भेटलो, म्हटलं “सायबा, लेका जावुन तरी ये… बग… जमलं तर जमलं… त्या सुपरवायझरला भेट…”

त्याने जायचं वचन तर दिलं…

या गोष्टीला आता जवळपास ८ – १० महिने उलटले…

मी पुन्हा आमच्या या सायबाला शोधलं, सुपरवायझरला शोधलं… दोघेही सापडले नाहीत..!

मी बसलो स्वतःच्याच नशिबाला दोष देत…

यानंतर मागच्या आठवड्यात, कर्वे रोडवर जाण्याचा योग आला… भयंकर ट्रॅफिक…रस्त्यावर मेट्रोचं काम चालुच होतं…

पावसाची बारीक भुरभुर… डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल आणि चेहरा संपुर्ण रुमालानं झाकलेला अशा माझ्या अवतारात कशीबशी कसरत करत मोटार सायकल चालवत मार्ग काढत निघालो होतो…

तेव्हढ्यात, एव्हढ्या गर्दितुनही “सर… सर… थांबा… थांबा” असं कुणीतरी जीवाच्या आकांतानं, अंगावर येणा-या गाड्या चुकवत, पळत पळत कुणीतरी युनिफॉर्म घातलेला माणुस मागुन येत असलेलं मला हँडलवरच्या काचेतुन दिसलं…

मी थांबण्याचा प्रश्नच नव्हता. मी दुर्लक्ष करुन पुढे निघालो…

आणि हाक ऐकु आली,.. “ओ अभिजीत सर… थांबा… थांबा…” तो युनिफॉर्म घातलेला माणुस माझं नाव घेतोय म्हटल्यावर, मी फट्कन गाडी बाजुला घेतली…

युनिफॉर्म घातलेली व्यक्ती धापा टाकत जवळ आली… डोक्यावर कॅप, रुबाबदार युनिफॉर्म … पायात शुज आणि चेह-यावर तेज..!

आला आणि गाडीवरच डायरेक्ट मिठ्ठी मारली… आणि ओक्साबोक्शी रडायला लागला… मला काहीच कळेना, चाललंय काय… त्याची मिठी सैल करत त्याला बाजुला केलं… बघीतलं तर हा आमचा “साहेब” माझा सायब्या..!

म्हटलं, “सायबा, माझ्या चेह-यावर रुमाल, गॉगल… तु इतक्या गर्दीत कसं ओळखलंस मला?”

तो म्हटला, “का नाही ओळखणार? भिका-यांच्या गर्दित मी रुमाल लावुनच फिरायचो, भीक मागायचो, तेव्हा तुम्हीच मला “ओळखलं” होतंत… तुमचीच सवय उचलली मी…”

हे बोलताना तो लहान बाळासारखा रडायला लागला… मलाही माझे अश्रु आवरणं कठीण गेलं…

म्हटलं, “सायबा, युनिफॉर्म कसला हा?”

म्हणाला, “सर, मी लागलो ना मेट्रो मध्ये कामाला… तुम्हीच जा म्हणाला होतात ना..!”

“मी शोधलं तुम्हाला, पण सारख्या बदल्या होतात आणि मी एक दिवस पण सुट्टी घेत नाही… म्हणुन भेटु नाही शकलो… आता दोन तीन महिन्यात प्रमोशन आहे माझं सुपरवायझर म्हणुन..!”

मी गाडीवरुन उतरलो आणि गच्च मिठी मारली त्याला… रडतंच म्हणालो, “सायब्या यार खरंच साहेब झालास की रे..!”

“हां सर, कामावर हाताखालचे लोक, साहेबच म्हणतात मला, त्यावेळी तुमची खुप आठवण येते..!”

मी हसत म्हटलं, “तुझा सोनेरी चष्मा कुठंय?” तर म्हणाला, “मी तो कामावर आणत नाही, घरी ठेवलाय… कामासाठी मी दुसरा चष्मा घेतलाय… माझा तो सोनेरी चष्मा कामावर फुटला तर..?”

“जपुन ठेवण्यासारखी एकच गोष्ट आहे ती माझ्यासाठी सर…” माझ्या डोळ्यात खोलवर बघत तो बोलला…

मी मग माझ्या मोबाईलवर त्याचा फोटो काढला… आणि म्हटलं, “सायब्या हा तुझा युनिफॉर्म मधला फोटो पण मी आयुष्यभर जपणार आहे बरं का..!”

“हो सर”, म्हणत पुन्हा रडतच, कुशीत शिरला…

रस्त्यात खुप गोंगाट सुरु होता ट्रॅफिक मुळे… कर्णकर्कश हॉर्नचा आवाज, पोलिसांच्या शिट्ट्या, गाड्यांचा आवाज… पण यातलं काही काही ऐकु येत नव्हतं मला..!

कसं ऐकु येणार..? मी ऐकत होतो, मला बिलगलेल्या “सायब्याचं” मधुर झालेलं जीवनगाणं…

त्याच्या हृदयातली लयबद्ध धडधड जणु तबला वाजवत होती… त्याचे श्वास ही पेटी झाली होती, त्याचा प्रत्येक हुंदका हा आलाप होता…

आणि मी..? मी झालो होतो… त्याच्या सुंदर गाण्याला दाद देणारा एक रसीक श्रोता..!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*