Income Tax Office (Exemptions), Pune – माणसांचं एक गाव…!!!

सोहम ट्रस्टला आज 80 G प्राप्त झालं..!

सोहम ट्रस्टला मिळालेल्या देणगीवर इथुन पुढे आयकरातुन सुट मिळेल

या 80 G मिळवण्याच्या प्रवासाच्या निमित्ताने आज काही सांगावसं वाटलं…

कुठल्याही सरकारी कार्यालयात जायचं म्हटल्यावर अंगावर माझ्या आधी काटा येतो, …त्यात इन्कमटॅक्स ऑफिस म्हटल्यावर तर पहिल्यापासुनच घाबरलो होतो… उगीचंच…!

“इन्कमटॅक्स ऑफिस मध्ये अमुक तारखेला कार्यालयीन वेळेत उपस्थित रहा”, असलं पत्र असो, किंवा “इन्कमटॅक्स इन्स्पेक्टर साहेबांना बोलायचंय तुमच्याशी”, असली वाक्यं ऐकुनच मी गर्भगळीत व्हायचो…

वाटायचं… कशाला हवंय आपल्याला 80 G? जावु दे ना !

पण एखाद्या संस्थेकडे 80 G असणं हे मानाचं समजलं जातं… नुसती आयकरातुन सुट एव्हढंच याचं महत्व नसतं… ज्या संस्थेकडे 80 G असेल , त्या संस्थेची credibility वाढते… कारण 80 G मिळणं किंवा मिळवणं, वाटतं तितकी सोपी गोष्ट नाही, तावुन सुलाखुन निघावं लागतं…

ज्या संस्था अतिशय चोख काम करीत आहेत, अशा आणि अशाच संस्थांना 80 G मिळतं… 80 G असणं म्हणजे त्या संस्थेला “राजमान्यता” मिळणं…!

आता मला ही “राजमान्यता” मिळवायची असेल तर हा सारा प्रवास मला करावाच लागेल असं म्हणत सुरुवात तर केली…

पहिली भेट झाली इन्कमटॅक्स इन्स्पेक्टर सुखदा आगरकर मॅडमशी… जराशा संशयानेच मॅडमने माझ्या कामाची तपासणी सुरु केली… सुरुवातीला रागीट वाटणाऱ्या, पदाला साजेल अशी भिती वाटायला लावणाऱ्या, या मॅडम माझ्या कामात मनानं हळुहळु सहभागी झाल्या…
वृद्ध भिक्षेक-यांसाठी चाललेलं हे रस्त्यावरचं काम पाहुन मनानं आधीच मृदु असलेल्या या मॅडम आणखी मृदु होत गेल्या… बघता बघता एक दिवस सुखदा आगरकर नावाच्या या “मॅडम” माझी “बहिण” होवुन गेल्या …

आता मी यांना मॅडम नाही ताई म्हणतो… “मॅडम ते ताई – व्हाया इन्कमटॅक्स ऑफिस” हा प्रवास घडला..!

आयुष्यात खरंच काळजी घेणारी एक बहिण मिळाली… हा माझ्या भिक्षेक-यांचाच आशिर्वाद असावा…!

पुढच्या टप्प्यावर भेटले श्री. नागेश पालकर सर आणि संदिप परमार सर…
इथले वरिष्ठ अधिकारी…
यांनीही आधी साशंकतेने मला ठाकुन ठोकुन पाहिले… आपल्याला दिलेलं कर्तव्य चोख पार पाडलं… जेव्हा या वरिष्ठ अधिका-यांची कामाबाबत खात्री झाली, तेव्हा मात्र यांनी 80 G मिळण्यासाठी गती मिळेल अशा सर्व बाबी कायद्याच्या चौकटीत राहुन केल्या…
माझ्यासाठी ते करत असलेली धावपळ पाहुन दरवेळी मी भारावुन जायचो… खरंतर हे प्रेम मला मिळत होतं, माझ्या रस्त्यावर बसलेल्या म्हाताऱ्या माणसांमुळं…

आणि हे दोघेही अधिकारी, त्या म्हाताऱ्या माणसांना “माणसांत” आणण्यासाठी इथं धडपडत होते, मला त्यांची तळमळ कळत होती..! कसे आभार मानावे यांचे..?

यानंतर च्या टप्प्यावर भेटले पांडे सर, वरिष्ठ अधिकारी… यांना पाहुनच आधी वाटलं… गेलं आपलं 80 G, इथंच रिजेक्ट होणार… पण इथंही वेगळाच अनुभव…

“डाक्टरसाब, कैसे हो?” असं म्हणत दरवेळी प्रेमानं हात हातात घ्यायचे…
“क्युं भाई, कैसे चल रहा है काम? पहले ये बताओ आपकी फॅमिली (भिक्षेकरी) ठीक है ना?”

मी हसुन हां सर म्हणायचो…

खुप वेळा काम सोडुन ऑफिसला जाणं व्हायचं…

एकदा तर, त्यांनी हात जोडले आणि म्हणाले, “माफ करना डाक्टरसाब, इस सरकारी काम की वजह से आपको बारबार यहां आना पड रहा है… आपका टाईम जा रहा है… हो सके तो हमें माफ करें…” त्यांच्या या वाक्यांनी माझे डोळे पाणावले होते तेव्हा…

याच अधिका-यांच्या वेषातल्या “माणसानं” माझा हात धरुन एकदा त्यांच्या वरिष्ठ अधिका-यांपुढे मला उभं केलं होतं…आणि तावातावानं ते आपल्या वरिष्ठ अधिका-यांना म्हणाले होते… “दे दो सर इनको 80 G आज के आज, इस इन्सान की जिम्मेदारी मै लेता हुँ…”

काय म्हणु या माणसाला..? मी कोण यांचा? हे माझी जबाबदारी कोणत्या बेसीस वर घेत आहेत?

बाहेर पडतांना मी त्यांना चाचरत विचारलंही होतं, “सर, आप… मेरी… जिम्मेदारी..?”

तर म्हणाले… “भई तुम पहले इन्सान मिले हो मुझे … समझे के नही? “इन्सान”…!!! इसलीये बॉससे भी पंगा लिया मेरे भाय…”

मी खाली वाकलो यांचे पाय धरण्यासाठी… मला इन्सान म्हणणारा हा “माणुस” आभाळाएव्हढा मोठा भासला मला…

यापुढे भेटल्या प्रमिला दामसे मॅडम… वरिष्ठ अधिकारी…!

माझ्याकडे पहात त्या म्हणाल्या… “डॉक्टर आहात तुम्ही..?”

मी ही माझ्याकडं पाहिलं… पावसाळ्यात वापरायचा १०० रुपयाचा बुट, अंगावर मळखाउ, जरासा चुरगाळलेला शर्ट… साधारण तशीच पँट… केस विस्कटलेले… आणि डोळे सैरभैर…

काय करणार… कामावर चार बॅगा घेवुन फिरतांना अशीच अवस्था होते माझी…!

कुणालाही पहिल्या भेटीत मी डॉक्टर आहे असं सांगितल्यावर पटतच नाही, पुढे मी सांगतो… “भिक्षेक-यांचा डॉक्टर…!”
हे सांगीतल्यावर मात्र, “हां… मग बरोबर आहे”, असे भाव येतात लोकांच्या चेहऱ्यावर…

खरंतर, डॉक्टर च्या प्रस्थापित व्याख्येत न बसणारा मी..! कदाचित म्हणुनच अप्रस्थापीत काम करतोय..!!!

कालांतरानं मॅडमचं मत माझ्याबद्दल बदलत गेलं…

मॅडमशी बोलतांना, संवाद साधतांना मला जाणवलं… मॅडम उच्च पदावर जरुर आहेत पण गरीबांविषयी कणव आहे…

मी काही फोटो दाखवले मॅडमला… चार पाच फोटो पाहुन त्यांनी फाईल बंद केली… पुढे पाहुच शकल्या नाहीत त्या…

कुणाच्या तरी आईवडीलांची, या म्हाताऱ्या माणसांची रस्त्यावर होणारी परवड पाहुन त्या गलबलल्या…

फोटो पाहुन मॅडमनी हळुच चेहरा वळवला, त्यांच्या डोळ्यातुन ओसंडुन वाहणारी ममता माझ्या नजरेतनं कशी सुटेल?

बहुधा त्यांच्यातली एक “मुलगी”, एक “कन्या” जागृत झाली असावी… डोळ्यांत स्पष्ट दिसत होतं त्यांच्या…

कदाचीत म्हणुनच लोक म्हणतात, एक तरी “मुलगी” असावी… मॅडमकडे पाहुन जास्त प्रकर्षाने ते जाणवलं…!

यानंतर मॅडम स्वतः माझ्याबरोबर येत सरदार सिंग मीना सर, कमिशनर ऑ इन्कमटॅक्स या शेवटच्या टप्प्यावर घेवुन गेल्या…

मी कागदपत्रांचं मलाही पेलवणार नाही एव्हढं मोठं बाड घेवुन गेलो होतो…

सुरुवातीला दामसे मॅडम साहेबांकडे गेल्या… त्यांनी सरांना काय सांगितलं कोण जाणे, पण साधारण १० मिनिटांनी मला आंत बोलावणं आलं… मी दबकत बसलो…

सरांच्या डोळ्यांत पाहिलं… एक सेवाव्रती, कर्तव्यनिष्ठ असे हे अधिकारी आहेत हे लग्गेच जाणवलं…

मी म्हटलं… “सर मैं कुछ बोलना चाहता हुँ…”

“बोलो”, असं म्हणत ते खुर्चीत रेलुन बसले… पुढची १५ मिनिटं मी वेड्यागत बोलत राहिलो…

सरांचा वाक्यागणिक बदलणारा चेहरा मला जाणवत होता…

माझं झाल्यावर, खुर्चीतुन ते उठले, आशिर्वाद देत म्हणाले, “God bless you my boy… काम बंद नही होना चाहिये, हम सब आपके साथ है…”

“मॅडम अभ्भी के अभ्भी, आज के आज 80 G सर्टीफिकेट इनको इश्श्यु करीये..!”

माझा कानांवर विश्वास बसेना… आज २८ ऑगस्टला संध्याकाळी ५ वाजता 80 G सर्टीफिकेट माझ्या हातात होतं… मला, माझ्या कामाला, आणि माझ्या भिक्षेक-यांना शेवटी “राजमान्यता” मिळाली तर..!

हे सर्टीफिकेट घेवुन मी दालनाबाहेर पडलो…

आता खुप खुप आनंद व्हायला पाहिजे, पण कोणाला? तर मला…

कुणी पार्टी मागीतली, तर द्यावी लागेल… कुणाला? तर अर्थात् मलाच ना…

पण झालं उलटंच… ऑपरेशन थिएटर बाहेर जीव मुठीत घेवुन उभ्या असणाऱ्या नातेवाईकांगत सुखदा ताई दालनाबाहेर माझी वाट बघत उभ्या होत्या, धास्तावलेल्या नजरेनं…

हातात सर्टीफिकेट पाहुन अक्षरशः ओरडायच्याच राहील्या होत्या… जणु काय त्यांनाच हे सर्टीफिकेट मिळालंय..!

लंच टाईम मध्ये मला घेवुन चक्क त्या एका रेस्टॉरंटमध्ये घेवुन गेल्या आणि मलाच त्यांनी पार्टी दिली…

मी म्हटलं, “ताई, तुम्ही असं करताय, जसं काय 80 G तुम्हालाच मिळालंय…”

त्या म्हणाल्या, “माझ्या भावाला मिळालंय म्हणजे मलाच मिळाल्यासारखं आहे ना?”

त्यांच्या या एका वाक्यानं मी हलुन गेलो…

इन्कमटॅक्स ऑफिसच्या इतिहासात नोंद घ्यावी अशी ही घटना असेल..!

एके दिवशी पावसात काही केल्या माझी जुनी मोटृरसायकल चालुच होईना… इन्कमटॅक्स ऑफिसचेच एक कर्मचारी श्री. प्रविण समोरुन आले, स्वतःच्या गाडीची किल्ली माझ्या खिशात कोंबत म्हणाले… “माझी गाडी घेवुन जा… मी जाईन चालत..!”

आता माझे सर्व बांध फुटले…

किती प्रेम करतात ही लोकं..? का? तर मी हे भिक्षेक-यांचं काम करतो म्हणुन…

भिक्षेक-यांनी मला खरंच किती काय काय दिलंय…!

तुम्हांसारख्या जिवाभावाच्या माणसांशी जोडला गेलो, ते ही याच भिक्षेक-यांमुळेच…!

बघा न् तुम्हीही किती प्रेम करता माझ्यावर? किती विश्वास ठेवता माझ्यावर? Unconditional!

कसं उतराई व्हावं मी या तुमच्या प्रेमातनं..???

हे काम सुरु करण्याअगोदरही लोक मला “रिस्पेक्ट” द्यायचे… पण त्यात “आदर” किती असायचा कोण जाणे…!

लोकं येता जाता गुड मॉर्निंग सर गुड आफ्टरनुन सर म्हणत “विश” करायची… पण त्यात “विश” किती आणि “विष” किती असा प्रश्न पडायचा …

लोक खुप “मान” द्यायचे तोंडावर, आणि वेळ आली की “मान” कापायलाही कमी करायचे नाहीत…

पण हे काम सुरु केल्यानंतर जे प्रेम मिळतंय, जी माया मिळत्येय ती मात्र निखळ, नितळ आणि सर्वांगसुंदर आहे !

इन्कमटॅक्स ऑफिस मध्येही हृदय असणारी माणसं भेटली… ख-या अर्थानं माणसांचं एक गाव भेटलं…

मी कुठंतरी वाचलं होतं… डोंगरावर “चढणारा” माणुस “झुकुन” चालतो… पण उतरतीला लागलेलाच माणुस “ताठ्यात” चालतो…

या ऑफिसातल्या झुकुन, नम्रतेनं चालणाऱ्या सर्व वरिष्ठ, अतिवरीष्ठ अधिका-यांकडे, कर्मचाऱ्यांकडे पाहुन जाणवतं… ही माणसं ही वर चढताहेत… माणुस म्हणुन..!

त्यांच्यातल्या या माणुसकीला, भिका-यांचा एक प्रतिनिधी म्हणुन माझा साष्टांग नमस्कार …!

ही सुद्धा कृपा रस्त्यात बसलेल्या त्या भिक्षेक-यांचीच याची मला जाणिव आहे…!

शेवाटी, मी सर्वांचा निरोप घेवुन निघालो, जातांना सुखदा ताई म्हणाल्या, “खरंतर इतक्या लवकर 80 G मिळायलाच नको होतं…”

मी चमकुन त्यांच्याकडे पाहत विचारलं, “का हो ताई..?”

त्या हसुन म्हणाल्या, “अरे यानिमित्ताने तरी येत होता बहिणीकडे, आता तुझं काम झालं, आता कशाला फिरकणार तु इकडे..?”

मी म्हटलं, “खरंय… पुर्वी ऑफिसला येत होतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांना, इन्स्पेक्टर मॅडमना भेटायला, ते ही काम घेवुन… मनात काही स्वार्थ घेवुन…”

“पण, तुमच्याबरोबरच, तुमच्याचमुळै, दामसे मॅडम सुद्धा बहिण म्हणुनच मला मिळाल्या आहेत…”

आता येणार ते… त्या खुर्चीत बसलेल्या या माझ्या दोनही बहिणींना भेटायला… कुठलंही काम हातात आणि स्वार्थ डोक्यात न ठेवता… केवळ तुमचा भाऊ म्हणुन…

“माणसांनी” गजबजलेल्या या गावात मी पुन्हा पुन्हा येणार… येत राहणार… कारण हे गांवही आता माझंच झालंय…आणि गावातला प्रत्येक माणुसही…!!!

खरंय ना ताई सांगा न्…!

 

 

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*