सांगलीला डॉ. सौ. निकम राहतात. खुप मोठं सामाजीक काम त्या करतात. त्यांचा मुलगा आदित्य हा “स्पेशल” कॅटेगरीतला… जागतीक दर्जाचा चित्रकार…
ताई सख्ख्या भावाइतकंच माझ्यावर प्रेम करतात.
आज मला भेटायला त्या आल्या होत्या. येताना म्हणाल्या, “तुझ्या भिक्षेकरी कुटुंबाला काय गिफ्ट आणु सांगलीहुन?”
मी म्हटलं, “ताई तुम्हाला माहित आहे, मी या माझ्या लोकांना अशी काहीच गिफ्ट देत नाही…”
त्या तेव्हढ्याच “सांगली स्पेशल” अधिकारवाणीनं बोलल्या… “गप रे, मला काय म्हाईत नाय काय? कळत्तंय की मला… काय तु बी बोलायलायस बाबा…???”
आज आल्या, मला उत्सुकता होती… या आता गिफ्ट काय देणार?
आल्यावर मला म्हटल्या… “तु औषध देतोयस, चांगलंच आहे रे… पण ही लोकं दात घासत्यात काय रे कधी?”
मी चकित झालो… म्हटलं, “बहुधा नाहीच…”
“आणि मग औषध काय द्यायलाईस नुसता लेका… काय तुझं नव्हंच बग…”
“मी समजलो नाही ताई…”
ताईंनी बॉक्समधुन टुथपेस्ट आणि भारीतला टुथब्रश काढला आणि माझ्या या लोकांना वाटायला लागल्या…
तेव्हढ्याच अधिकार वाणीनं त्यांनाही प्रेमाची तंबी देत सांगितलं, “दात घासायचं रोज… घरात नुस्तं ठेवायला दिलेलं नाही ते… क्काय…?”
खरंच मी या गोष्टींचा विचारच नव्हता केला… दांत स्वच्छ असतील तर ब-याच रोगांपासुन बचाव होतो…
मी ताईचा हात हाती घेवुन म्हटलं, “थँक्यु ताई, तुझं गिफ्ट आवडलं मला…! मला कसं सुचलं नाही हे आधी?”
तर म्हणाल्या, “ताई म्हणतोस न्हवं काय? मग चार पावसाळे मी जास्त बगीतले आस्तील का नाही…?”
असं म्हणुन त्या हसायला लागल्या…
आजपासुन माझ्या औषधाच्या बॅगेत टुथपेस्ट आणि टुथब्रशला सुद्धा स्थान मिळेल…
ताईला मनातलं स्थान ताई म्हणुन होतंच ते आता आणखी दृढ होईल…!!!
मागं म्हटल्याप्रमाणं प्रत्येकवेळी डायरेक्ट भिक्षेक-यांवर फोकस करुनही भागत नाही. काहीवेळा भीक मागायला जी परिस्थिती कारणीभुत असते तीचाही विचार करावा लागतो. उदा. मुलगा आहे पण कमवत नाही, मुलगी आहे पण लक्ष देत नाही… अशावेळी मी या भिक्षेक-यांपेक्षा त्यांच्या मुलांच्यावर फोकस करतो. यांच्या मुलांना नोकरी देण्याचा प्रयत्न करतोय…
काही भिक्षेकरी असे आहेत, ज्यांच्या मुलांनी एकतर शाळा सोडल्येय किंवा पुस्तकं आणि फी भरायला पैसे नाहीत म्हणुन मधुनच शिक्षण सोडलंय…
ही मुलं अशीच राहीली तर, ही पिढी देखील भीकच मागणार…
आणि म्हणुन मग आता या मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करायला मी सुरुवात केलेय… जेणेकरुन ही मुलं तरी शिकतील आणि भीक मागणार नाहीत.
आनंद या गोष्टींचा आहे की, या भिक्षेक-यांना हळुहळु का होईना पण मुलांच्या शिक्षणाचं महत्व पटतंय…
वह्या पुस्तकं मागताहेत…
असेच एक चाचा आहेत, त्यांच्या मुलीचे पुस्तक आणि वह्यांवाचुन शिक्षण अडलेलं होतं…
मुलगी 11 वी कॉमर्स करत्येय… मला अभिमान वाटला…
या चाचांनीही मला पुस्तकं मागितली होती…
सौ. सुनिताताई कुलकर्णी यांच्या माध्यमातुन ११ वी साठी लागणारी सर्व पुस्तकं आज या चाचांच्या पत्नीकडे दिली…
“हमारे बाद हमारी औलाद यहां नही आयेगी बेटा…” असं म्हणत आमच्या डोक्यावर हात ठेवत… डोळे पुसले…
सुनिता ताई असोत वा निकम ताई… समाजात अशा या ताई आहेत, म्हणुनच माझ्यासारखा माणुस काम करु शकतोय…
चाचाची पुढची पिढी निश्चितच भीक मागणार नाही, यांत सर्व श्रेय या ताईंचं… मी नाममात्र..!
जातांना एक बुजुर्ग म्हणाले… “मियां, कभी टुथपेस्ट देते हो, कभी टुथब्रश देते हो, कभी दवा देते हो, कभी किताबें देते हो… आप असल में किस चीज के डाक्टर हो? कौनसा ईलाज करते हो?”
मी म्हटलं, “बाबा, जो चीज इन लोगोंको इन्सान बननेसे रोक रही है, मै उस हर चीज का ईलाज करता हुँ…! कभी डाक्टर बनके, तो कभी इनकी औलाद बनके…!!!”
नतमस्तक !! ?♂️?♀️
Suita Tai and Nikam Tai are extraordinary indeed. But a just ordinary ME is now axiousely waiting to meet you personally. Hopefully mid 2019.