दसरा गेला, दिवाळी आली…!
याच दिवाळीच्या मुहुर्तावर आम्ही आणखी एक छोटंस्सं पाऊल उचलतोय, भिक्षेक-यांना कष्टकरी बनवण्यासाठी…!!!
डॉ. मनिषा हिने एक संपुर्ण आयुर्वेदीय उटणं बनवलं आहे स्वतः… आणि इतर दोन भिक्षेक-यांच्या मदतीने या उटण्याचं पॅकींग, स्टिकींग आणि इतर कामं करवुन घेत आहोत. या कामाचा त्यांना रोज मेहनताना देत आहोत.
थोडक्यात, सुरुवातीला या दोन भिक्षेक-यांच्या मदतीने उटणं बनवलंय… या उटण्याचा मुळ घटक आहे चंदन…!
कोणत्याही उटण्याचा मुळ घटक हा मुलतानी माती असते…
पण आम्ही आमच्या या उटण्याचा मुळ घटक चंदन ठेवलाय…
कारण एकच… आजपर्यंत मातीतच पडुन असणाऱ्या भिक्षेक-यांना आम्हाला जाणिव करुन द्यायचीय, आजपर्यंत नुसतेच झिजलात… चला या दिवाळीत सुगंधी बना… झिजुन संपुन जाण्यापेक्षा… चंदन होवुन मागं दरवळा…!
या दिवाळीत या दोघांच्याही आयुष्यात दीप उजळतील… अंधःकार दुर करण्यासाठी एक पणती आमच्याकडुन लावत आहोत…!
हळुहळु इतरही अनेक भिक्षेक-यांना यात सामिल करुन घेवु…
यापुढं माझ्या या लोकांना परफ्युम तयार करायला शिकवणार आहोत, सुगंधी फेस पॅक करायला शिकवणार आहोत, सुगंधी हेअर वॉश करायला शिकवणार आहोत… अजुनही ब-याच गोष्टी…!
इतरही अनेक उद्योग शिकवायचे माझ्या डोक्यात होतं… पण मी मुद्दाम सुगंधी गोष्टीच शिकवायला आणि विकायला निवडलेत…
कारण…
समाजातला जो सर्वात दुर्लक्षित आणि दुर्गंधीत समजला जाणारा घटक आहे… तोच सुगंधही निर्माण करु शकतो हेच मला जाणवुन द्यायचंय…!
सुगंध वाटता वाटता या दरिद्री नारायणालाच सुगंधी बनवायचंय…
हा सुगंध असेल स्वाभिमानाचा !
बघु सुरुवात तर केलीय…
आपल्याला या भिक्षेक-यांचा उत्साह वाढवायचा असेल तर सध्या त्यांच्या मदतीने कमी प्रमाणावर तयार केलेलं उटणं आपण विकत घेवु शकता.
यातुन मिळणारे पैसे, पुढील कच्चा माल घेण्यासाठी व जास्तीत जास्त भिक्षेक-यांना सहभागी करवुन घेवुन त्यांना रोजचा मेहनताना देण्यासाठी वापरला जाईल.
सोहम उटणं
वजन : २० ग्रॅम (1 पाकिट)
किंमत : रु. २५/-
पॅकींग : एअर टाइट सिल्व्हर एन्व्हलप
सध्या फक्त खालील पत्त्यावर उपलब्ध :
डॉ. मनिषा सोनवणे
सोहम ट्रस्ट
पंचमुखी मारुती मंदिराजवळ फणसे मेडीकल स्टोअरवरती शिवाजीनगर गावठाण पुणे 411005
ऑर्डर साठी संपर्क क्रमांक: ८३०८३१५४९४
हे सगळं करण्याचं मुळ कारण हे की, सारखं कुणाकडंतरी या लोकांसाठी नोकरी मागायला मी जाण्यापेक्षा, आम्हीच काही रोजगार निर्मिती करावी, जेणेकरुन तयार होणाऱ्या भिक्षेक-यांस त्वरीत आमच्याचकडे काम देता येईल…
दुसरं म्हणजे, दिवाळीच्या मुहुर्तावरच हे सगळं करायचं कारण एकच…
आपल्यासारखेच यांच्याही दारी दीप लागोत, नविन कपडे मिळोत, गोडधोड मिळो…
हे सगळं भिक मागुन नाही… स्वतःच्या पैशानं विकत आणलेलं…!
माझीही गंमत अशी, की डोळे माझे ब्लॅक आणि व्हाईटच आहेत, पण स्वप्नं मात्र रंगीत पाहतोय… अर्थात तुम्हां सर्वांच्या साथीनं… !!!
Leave a Reply