बुरखा पहननारी एक आपा! मोठ्या बहिणीला आपाच म्हणतात!
शुक्रवारी म्हणजेच “जुम्मे के दिन” मला एका ठिकाणी ती दिसते..!
हि भीक मागत नाहीत, पण कुणी काही दिलं तर नाकारतही नाही.
मला नवल वाटायचं हिचं..!
बोलायचा प्रयत्न केला होता मी… पण ती बोलणं टाळते माझ्याशी!
बरोब्बर मागच्या महिन्याच्या एका शुक्रवारी आली, आणि त्रास सांगुन औषधं घेवुन गेली..!
“आता कसं वाटतंय तुला..?” बळंच असं दरवेळी विचारण्याच्या निमित्ताने मी तीला एकेदिवशी बोलतं केलं!
हिचं वय असेल २८ – ३०. दिसायला नीटनेटकी!
ज्याच्याशी लग्न झालं… त्याने फसवलं..!
याने ६ – ७ बायकांना फसवुन काहीतरी आमिष दाखवुन प्रत्येकीशी लग्न केलं होतं. एकीचा दुसरीला पत्ता नाही!
१३ – १४ वर्षांपुर्वी याने तीलाही भुलवलं… लग्न केलं हिच्याशी..! तीनेही संसार मांडला..!
याचं बिंग फुटुन, हिला सारं कळेपर्यंत चार पोरं पदरात पडली होती.
हिने पोलीस स्टेशन गाठलं… पोलीसांनी याला दम दिला… समझोता घडवुन आणला… पण तेव्हापासुन हा फरार!
हिला कामधंदा काहीच नाही, राहतं घर सोडावं लागलं..!
ही आणि चारही मुलं आली रस्त्यावरच!
एव्हढ्या परिस्थितीतुनही हिने चारही पोरांना शाळेत टाकलंय. चारही मुलं शिकताहेत, ही समाधानाची गोष्ट!
थोरला मुलगा १२ वर्षाचा, या कोवळ्या वयात त्याला जाण आली. शाळा शिकत तो सिग्नलला काही वस्तु विकतो आणि आपल्या इतर तीन भावंडांना आणि आपल्या आईला जगवतोय.
ती म्हणते, “मै सिर्फ अल्लाह के भरोसे हुँ… जुम्मे के दिन यहां पे जो मिलता है, मै लेती हुँ… अच्छा नही लगता, लेकीन क्या करुँ… मजबुरी है..!”
“मजबुरी किसी भी इन्सान से कुछ भी करवा लेती है..!”
मी म्हटलं, “आपा, इन बच्चों को लेके रहती कहां हो?”
म्हणाली, “अल्लाताला ने बहुत बडा घर दिया है… बहुत मस्त है मेरा घर… दुनियामें किसी के भी पास नही..!”
“छप्पर की तरफ देखो तो आसमान दिखता है…”
“हवा इतनी आती है कि खिडकी की जरुरत नही…”
“धुप हि सहारा देती है, लाईट की जरुरत नही…”
“बाल्कनी से देखो तो गाडी आते जाते दिखती है… बिल्कुल नजदिकसे…”
“लोगों के घर मे नल होते होंगे… अल्लाताला मेरे घर डायरेक्ट पानी भेजता है… कभी भीगते है… कभी प्यास बुझा लेते है… भीगते है तो बारीश बोलते है… प्यास बुझती है तो उसीको जल बोलते है..!”
मी चाचरत, खाली मान घालुन म्हणालो, “म्हणजे तु फुटपाथवर राहतेस, बरोबर?”
ती केविलवाणं हसत, मान दुसरीकडं वळवत म्हणते, “आप फुटपाथ बोलो साहब, हमारे लिए तो घरही है..! ‘फुटपाथ’… फुट – पाथ..! जिसके ‘पैर’ जमीन पे है… उसीको ‘रस्ता’ मिलता है साहब..!”
मी शहारलो..!!! जीवनातलं केव्हढं मोठं सत्य हिने सहज सांगितलं..?
फुटपाथ..? फुट आणि पाथचं इतकं सुंदर विवेचन मी जन्मात कधी ऐकलं नव्हतं!
“पोरं अभ्यास कुठं करतात, तुझ्या या घरात?” मी विचारलं..!
म्हणाली, “दिन होता है तो सुरज कि रोशनी में पढते है, रात होती है तो कॉर्पोरेशनशन के लाईट के नीचे..! उन्होंने लाईट बंद किया तो पढाई बंद!”
सुर्य माझ्या ओळखीचा असता तर सांगितलं असतं, देवा; रात्री अमुक अमुक ठिकाणी तुला यायला जमेल का? थोडा वेळ ये रे, कुणीतरी शिकतंय रे!
अगदीच नाही, तर चंद्राला सांगीतलं असतं… अजुन थोडा प्रकाश वाढव… पोरं शिकताहेत रे..!
ती खाली मान घालुन असते, मी म्हणतो, “आपा, आपको गुस्सा नही आता आपके पतीका? जिसने आपको छोड दिया..!”
ती म्हणते, “ना साहब… उसने धोखा दिया तभी तो ये दुनिया की असलीयत दिखी, वरना कौन दिखलाता?”
मी खोटं खोटं हसतो यावर..!
डोळ्यातनं नकळत पाणी येतं…
ती म्हणते, “साहब, आसुओंमे नमक होता है…”
“दुःख होता है तो ये ही आंसु दर्द देते है…”
“और खुशीमें ये ही नमकवाले आंसु भी मिठे बन जाते है…”
“वक्त वक्त की बात है साहब..!”
खरांय बाई..!
मी भांबावतो… “तु शिकली आहेस का गं आपा?”
“हां साहब… दुनिया की इस्कुल मेरकु जीने का अंदाज सिखाती है रोज…”
“मेरे जैसी औरत चार बच्चों को लेके फुटपायरी पे रहती है… तो जानो… दुनिया मेरको कितना सिखाती होंगी..!”
“हो गं आपा..! खरंय… तुझं!”
नकाशा नसतांनाही पक्षी योग्य ठिकाणी पोचतात…
माणसांकडे नकाशा असतो, तरीही पत्ते चुकतात..!
आपलं कोण परकं कोण हे कळतच नाही त्यांना..!
कौतुकाच्या हजार टाळ्यांपेक्षा, खांद्यावर पडलेला मदतीचा एक हात महत्वाचा!
पण, हाच मदतीचा हात तुला कुणी दिला नाही आपा..!
“मै आपको क्या मदत करु आपा..?”
“जी साहब..?”
तीने न कळल्यागत मला विचारलं..!
मी जरा रागावुन म्हटलं, “मै आपको आपा… बडी बहन बोले जा रहां हुँ… और आप है की मुझे सर, साहब बोले जा रही है… मुझे ये बिल्कुल पसंद नही!”
मी नाराज झाल्याचं तीला कळलं असावं…
ती बावरली… घाबरली..! चेहऱ्यावर स्पष्ट दिसलं..!!!
आपल्याकडुन काहीतरी भयंकर मोठी चुक झाल्यासारखं तीला वाटलं असावं…
ती कानाला हात लावत म्हणाली, “गल्ती हो गयी साहब… आप बोलीये… मै किस नामसे आपको पुकारु!”
“तुम मुझे भैय्या नही बोल सकती क्या..?” मी लटक्या रागानंच विचारलं..!
या माझ्या वाक्यांवर तीच्या चेहऱ्यावरची उमटलेली प्रतिक्रिया मांडण्यास मी असमर्थ आहे..!
देवी, सरस्वती… अजुन थोडी प्रसन्न असतीस माझ्यावर तर… हे तीचे भाव सुद्धा मी चितारले असते गं शब्दांतुन!
तु पण ना, कधी कधी कंजुषपणा करतेस हां..!
“या अल्लाह”, म्हणत इतका वेळ अंतर ठेवुन असलेली ती आपा, तीने बुरखा बाजुला सारला…
मी तंद्रीतुन बाहेर आलो…
म्हणाली, “मेरे भैय्या… देख… सबकुछ मैने खोया है… लेकीन आज तु मिला… कुछ खोने के बाद, कुछ मिलता है… मैने आजतक ये सुना था, लेकीन पयली बार मैने ये जाना..!”
“या खुदा, मेरे मरद को भी खैरिअत बक्षना… आज उसीके वजह से मुझे एक भाई मिल गया..!”
वाईटातुनही, काहीतरी चांगलं शोधण्याच्या तीच्या या वृत्तीला… “मेरा सलाम..!”
खरं सांगु? सगळेच लोक खेळाडु असतात…
कुणी मैदानावर खेळतात… तर कुणी मनाशी!
जिंकलेला प्रत्येकजण आनंदीच असतो… पण हरलेला..?
हि आपा हरलेली असुनही आनंदी होती… त्रास दिलेल्या नव-यालाही ही खैरिअत बक्षत होती..!
रस्त्यावर भेटलेल्या माझ्यासारख्या माणसाला भैय्या म्हणत होती..!
सगळाच गुंता..!
या गुंत्याचं मला भारी आकर्षण वाटतं..!
जोपर्यंत गुंता असतो, तोपर्यत सर्वच धागे एकमेकांमध्ये अडकलेले असतात…
पण…
गुंता सुटला की हेच धागे आपापसांपासुन दुर होतात..!
गुंता करुन एकमेकांना आपापसांत गुंतवुन ठेवायचं की’ गुंता सोडवुन सगळ्यांना एकमेकांपासुन स्वतंत्र करायचं… विभक्त करायचं… हा मला कायम पडलेला प्रश्न…
किंवा गुंताच म्हणा ना..!
मधल्या काळात तीच्या थोरल्या मुलाला भेटलो..
वय वर्षे बारा… पण अक्कल साठीची..!
हे पोरगं, आख्खं घर चालवतंय… शिकत शिकत… व्यवसाय करतंय…
मी याच्या खांद्यावर हात ठेवला..!
बारा वर्षाच्या पोराचा खांदा इतका मजबुत असतो..? चार लोकांची जबाबदारी घेण्याइतपत?
परिस्थिती बनवते..!
पहिल्या भेटीत हा म्हणाला होता, “सलाम आलेकुम सर!”
“वालेकुम अस्सलाम”, म्हणत मी त्याला रागावुन म्हणालो होतो… “तेरी अम्मी को मै आपा बोलता हुँ… और तु..?”
माझं वाक्य तोडत तो म्हणाला होता, “हां मामु… तेरको मै मामुच बोलेंगा रे..!”
मी हसत हसत, हातानंच त्याला माझ्या जवळ यायची खुण केली..!
अचानक त्याचा साठीचा पोक्तपणा गळुन पडला आणि तो पुन्हा बारा वर्षाचा अल्लड पोरगा झाला…
तो माझ्या गळ्यात पडुन रडायला लागला..!
मी त्याला म्हटलं, “रोना नही…”
तशी तो माझ्या गळ्या भोवतीची हाताची मिठी अजुन आवळत म्हणाला… “रोने दे ना मामु… बचपन से मै आजतक रोयाच नय..!”
माझ्या अंगावर काटा आला..!
“तु बचपनसे रोया नही? हम रोज रोना रोते है… अपनी जिंदगीपे..!”
गळ्याभोवती आवळलेल्या त्याच्या या मिठीनं माझा जीव कोंडला..!
बापरे, कोंडलेल्या या जीवालाच श्वास म्हणतात हे आज कळलं मला, याच्या रुपानं..!
एका संस्थेनं या आपाला ६ x ६ फुट ची जागा दिलीय वापरण्यासाठी..!
*मी या जागेवर पत्र्याचं शेड मारुन देतोय यांना..! पहिल्यांदाच घर बांधतोय कुणासाठी तरी..!*
*या शिवाय एक पुर्णपणे Covered अशी हातगाडी देतोय या कुटुंबाला..!*
आपाला मी सांगितलंय, “तु या गाडीवर भाजीपाला, कांदे बटाटे मिरच्या विकायच्या… पैसे कमवायचे आणि घर चालवायचं..!”
“सर्व पोरांना शिकु दे… अभ्यास करु दे… खेळु दे… मस्ती करु दे… त्यांचं बालपण हिरावुन घेवु नकोस..!”
तीला हे सांगितल्यावर ती लहान मुलासारखी रडायला लागली, म्हणाली… “इतनी तकलीफ क्युं ले रहे हो भैय्या..?”
आता या येडीला काय सांगु..?
दिवाळसण आला… बहिणीला कायतरी ओवाळणी द्यायची असते भाऊबीजेला..!
मी ओवाळणी म्हणुन आसरा दिला..!
धनत्रयोदशी ला धन पुजतात..!
जेव्हा ही आपा पैसे कमावुन घर चालवेल, पोरांना शिकवेल… तेव्हा या शिकलेल्या पोरांचंच मी “धन” म्हणुन पुजन करेन!
त्या धनत्रयोदशीची मी वाट पाहतोय!
दिवाळीची पहिली आंघोळ हे लोक आपल्या स्वतःच्या घरात करतील… “मामु” म्हणत ही पोरं मला हाक मारतील..!
मामु… या शब्दांतच किती “गोडवा” आहे… कुठला “पाडवा” याहुन मोठा असेल?
मी स्वप्नं पहात होतो…
दुरुन आपाच्या आलेल्या आवाजानं मी भानावर आलो…
“भैय्या दिवाली कब है आपकी?”
मी शांत राहुन दिवाळी कधी आहे याचा विचार करत राहिलो, ऊत्तर काही दिलं नाही..!
तीनं पुन्हा ओरडुन विचारलं… “अरे, बोलो ना, दिवाली कब है आपकी..?”
मी तीच्या शेजारी उभं रहात हळुच म्हटलं… “जीस दिन तु ये फुटपायरी छोडके अपने घर मे चली जायेगी… उसी दिन मेरी दिवाली..!”
ती हसत हसत रडली… की रडत रडत हसली मला शेवटपर्यंत कळलंच नाही..!
जाताना म्हणाली, “भैय्या, हैप्पी दिवाली…”
मी मागं वळत हसत म्हटलं, “हां आपा, हॅप्पी दिवाली!”
khuppppp channnn…..nehmi strong asnari mi aaj tumchya ya blog ne mla radavla….tumhala shant zop lagat asel na dararoj…khuupp chan kaam kartay