नायक!

आठ पंधरा दिवसांपूर्वी मला एक फोन आला, “सर इंदिरा कल्याण केंद्र तर्फे, आपणास एक पुरस्कार जाहीर झाला आहे, कार्यक्रमाची तारीख आहे १५ ऑगस्ट २०२१, याल ना?”
कार्यक्रमाचे आयोजक होते, आदरणीय श्री. शंकर भाऊ तडाखे, माजी मुष्टीयोद्धा विजेते (आजकाल “बॉक्सर” म्हटल्याशिवाय कळणार नाही ) आणि श्री. सचिन तायडे!

“हो.. हो… बरं… बरं…” म्हणत त्यावेळी गडबडीने मी फोन ठेवला होता, पुढे मी विसरून सुद्धा गेलो… आणि अचानक १४ ऑगस्टला पुन्हा फोन आला, “तुम्ही येताय ना?
खरंतर १५ ऑगस्टला मला भिक्षेक-यांच्या लसीकरणाची सर्व सोय पहायची होती, खरं तर वेळच नव्हता, मी म्हणालो, “कार्यक्रम होऊन जाऊ द्या, माझ्या शुभेच्छा आहेतच, पुढेमागे पुरस्काराचं बघू!”
पण, सचिनजी तायडे यांनी प्रेमानं गळ घातली, “ म्हणाले नक्की या , खरोखर काम करणाऱ्या लोकांनाच आम्ही पुरस्कार देत आहोत, याशिवाय एका फिल्मस्टार ला सुद्धा पुरस्कार आहे!

हो…ना…करत शेवटी पोचलो कार्यक्रमस्थळी… १५ ऑगस्टला… भव्य पटांगणात हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते… ज्यांना पुरस्कार मिळाला आहे, अशा पुरस्कारार्थीची आयोजकांनी एकमेकांमध्ये ओळख करून दिली. यात एक अतिशय रुबाबदार असा देखणा तरुण होता! माझी त्यांच्याशी ओळख करून देण्यात आली. “सर, हे देव गील, बॉलीवूड मधील खतरनाक खलनायक म्हणून यांची ख्याती आहे, दबंग मध्ये सलमान खान बरोबर आणि भाग मिल्खा भाग मध्ये फरहान अख्तर बरोबर यांनी काम केले आहे, तसेच अनेक हिंदी चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून काम केले आहे, शिवाय साऊथचे ते सुपरस्टार खलनायक आहेत.”

“हो का?” म्हणत मी सोपस्कार म्हणून त्यांना नमस्कार केला. त्यांना माझी सुद्धा ओळख करून देण्यात आली. माझ्या कामाविषयी त्यांनी बराच वेळ आस्थेनं माझ्याशी चर्चा केली, या कामात त्यांना किती रस आहे हे त्यांच्या वागण्या-बोलण्यातून दिसत होतं. यानंतर आम्ही आपापल्या जागेवर जाऊन बसलो. मला लसीकरणाच्या तयारीचे वेध लागले होते, मी सारखं घड्याळ पाहत होतो…

देव गील यांच्या बरोबर फोटो काढण्यासाठी झुंबडच्या झुंबड उडाली होती आणि त्यामुळे कार्यक्रमाला वेळ लागत होता. शेवटी कार्यक्रम सुरू झाला एकदाचा. देव गिल यांना सुद्धा एक पुरस्कार होता यावेळी… आम्ही सर्वजण स्टेजवर होतो… मला पुरस्कार दिला गेला… भाषण सुद्धा झालं… श्री. शंकर भाऊ तडाखे यांच्या शेजारी बसून मी हळूच कानात त्यांना बोललो, “मी आता निघू का? मला गडबड आहे.”

त्यांनी हळूच हात दाबत मला सांगितलं, “देव गील यांचे भाषण ऐकून मग जा.”
मी पुन्हा नाईलाजाने चुळबूळ करत उगीच बसून राहिलो.

देव गिल यांची ओळख करून देण्यासाठी एक गृहस्थ उभे राहिले. आता हे ओळख काय करून देणार? यांच्या किती फिल्म झाल्या? किती पडल्या? किती चालल्या? किती कमावले? हेच आता असणार, असं मी गृहीत धरलं…
पण झालं उलटंच…
ओळख करून देणाऱ्या व्यक्तीने चित्रपटांविषयी एक चकार शब्द काढला नाही, परंतु ते देव गील यांच्याबाबतीत जे काही बोलले, त्याने मी स्तिमित झालो… थक्क झालो! देव गील, हा माणूस चित्रपट सृष्टीला मिळालेला एक देखणा खलनायक, याच्या भूमिका पाहिल्या तर, सण्णकन् याला एक कानफटात ठेऊन द्यावी का? इतका राग येतो… इतका जीवंत अभिनय! ओळख करुन देणारांनी जे सांगितलं, त्यावरुन हा माणुस, वास्तविक आयुष्यामध्ये मात्र गेल्या दहा वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे.

अत्यंत तळागाळातल्या मुलांसाठी, महिलांसाठी हा माणूस जीव तोडून काम करत आहे. हे काम करताना, तो आपली ओळख कुणाला सुद्धा देत नाही, ज्या साध्याभोळ्या तळागाळातल्या लोकांसाठी तो काम करत आहे, त्यांना सुद्धा हे माहित नाही की चित्रपट सृष्टीमधला हा एक अत्यंत मोठा कलाकार आहे. वर्षातले तीन महिने हा माणूस सामान्यातला सामान्य होऊन झोपडपट्ट्यांमध्ये फिरत असतो आणि या लोकांच्या हिताचे काम करत असतो, या काळात तो कोणताही प्रोजेक्ट स्वीकारत नाही आणि मीडियाला त्याने खडसावून सांगितले आहे, “कोणत्याही प्रकारे, मी हे काम करतो याची बातमी द्यायची नाही!”

आणि म्हणून, त्याने आजवर केलेल्या एकाही कामाची माहिती कोणालाही नाही,किंवा त्याने कळु दिली नाही. परंतु अशा लपलेल्या चेहऱ्याला, शंकर भाऊ तडाखे यांनी शोधून काढलं आणि आज त्याला पुरस्कार मिळत होता. पुरस्कारानंतर देव गील यांना दोन शब्द बोलण्याची विनंती झाली. एखादा चित्रपट सृष्टीतला कलावंत स्टेजवर येतो तेव्हा प्रेक्षक साहजीकच त्याला एखादा डायलॉग म्हणून दाखवा, एखादी ऍक्टिंग करून दाखवा, एखादा डान्स करून दाखवा असा आग्रह करतात. साहजीकच प्रेक्षकांनी देव गील यांनासुद्धा असाच आग्रह केला…

परंतु नम्रपणे आणि ठामपणाने ते म्हणाले, “माझ्या डायलॉग आणि भूमिकेसाठी आपण चित्रपट पाहावा… मी आज सामाजिक कार्यकर्ता म्हणून इथं आलो आहे, चित्रपट कलावंत म्हणून नव्हे!”
या त्यांच्या वाक्याने त्यांनी सर्व सभागृह जिंकले असावे, निदान मला तरी जिंकले!
आता मात्र, मी त्यांचं भाषण कान देऊन ऐकायला लागलो. अस्खलीत हिंदी मध्ये त्यांनी समाज सेवा, राजकारण आणि तळागाळातल्या लोकांचे प्रश्न यावर पोटतिडकीने चर्चा केली. त्यांचे इतके प्रगल्भ विचार ऐकून मला पुन्हा धक्का बसला. तळागाळातल्या समाजाविषयी ह्या माणसाला कणव होती, त्यांनी या तळागाळातल्या समाजाला वर काढण्यासाठी अनेक कल्पना या वेळी सुचवल्या, परंतु जोपर्यंत आपले राज्यकर्ते या कल्पनांचा स्वीकार करणार नाहीत तोपर्यंत या “कल्पना” फक्त कल्पनाच राहणार आहेत.

पण त्यांनी ज्या कल्पना मांडल्या त्या कल्पनांमुळे, भीक मागणा-या लोकांसाठी मला आणखी काय करता येईल याची “Idea” मात्र मला नक्की मिळाली!

चित्रपटसृष्टी सारख्या गजबजलेल्या ठिकाणी काम करताना, हा माणूस झोपडपट्टीतला अंधार विसरला नव्हता… चित्रपटात बेधडक बळजबरी करणारा हा कलाकार, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात बोलताना मात्र भावूक होतो, याचा कंठ दाटून येतो! चित्रपटात बेभानपणे एखाद्याच्या गळ्यावर सुरी चालवणारा हा कलाकार, रस्त्यावरची नागडी उघडी पोरं जेव्हा उपाशी पोटी रस्त्यावरच झोपतात त्या विचारांनी याचा गळा दाटून येतो!

मी या माणसाच्या विचारांनी भारावून गेलो!

पडद्यावरचा असाच एक मराठी खतरनाक खलनायक… आदरणीय निळूभाऊ फुले! यांच्या जिवंत भूमिकांनी ग्रामीण भागात त्यांना कित्येक महिलांनी जोडे फेकून मारले आहेत… इतका जिवंत अभिनय! वैयक्तिक आयुष्यात मात्र त्यांनी जे सामाजिक काम केलं आहे, त्यासाठी त्यांच्या पायात, माझ्यासारख्यांचे कातडीचे जोडे घातले तरी ते कमीच आहेत!
एक ते आदरणीय निळू भाऊ आणि एक हे आदरणीय देव गील!!!

खलनायक कसं म्हणायचं यांना?
हेच खरे समाजाचे नायक आहेत!
चप्पल हातात घेऊन समोर उभ्या असणार्‍या एका मावशीला निळूभाऊ म्हणाले होते, “मावशी पोटासाठी करावा लागतय गं हे!”
त्यादिवशी देव गील सुद्धा आपल्या भाषणात हात जोडुन हेच म्हणाले होते, “पेट के लिये करना पडता है माई!”

वडाचं झाड कितीही मोठं झालं तरी सुद्धा पारंब्यांच्या रूपाने मातीला भेटण्यासाठी खाली झेपावं, तशीच ही सुद्धा माणसं…
कितीही उंचावर गेली तरी मातीतल्या माणसांसाठी वरुन खाली झेपावणारी!
कार्यक्रम संपला… चाहत्यांची देव गिल यांच्या बरोबरच्या फोटोसाठी झुंबड उडाली.

श्री. शंकर भाऊ तडाखे आणि सचिन तायडे यांना मी म्हटलं, “धन्यवाद, मला या कार्यक्रमाला बोलावल्याबद्दल. मी आधीच कार्यक्रमांतुन उठून जाणार होतो, परंतु तुम्ही मला देव गील यांचे भाषण ऐकण्याची विनंती केली म्हणून थांबलो, पण आज मला एक वेगळी दृष्टी मिळाली.”
यावर शंकर भाऊंनी माझा हात दाबत, डोळे मिचकावत म्हटले, “म्हणूनच मी तुम्हाला थांबा म्हटलं होतं डॉक्टर!”

आता मी निघणार, इतक्यात देव गील आपल्या सर्व चाहत्यांना सोडून माझ्याजवळ आले आणि म्हणाले, “Sir, Can I take picture with you? I will be blessed!”
इतकं म्हणुन स्वतःच्या मोबाईलवरुन फोटो घेतला!
बापरे, किती हा मोठेपणा या माणसाचा…ज्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी हजारो लोक आत्ता तिष्ठत उभे आहेत तो माणूस, माझ्यासारख्या भीक मागणाऱ्या लोकांसाठी काम करणाऱ्या एका सर्वसामान्य माणसाला जवळ येऊन, फोटो काढू का, हे विचारतो! स्वतः, इतकं काम करुन, दुस-याला मोठेपणा देण्याचा किती हा मोठेपणा!

मी यांना प्रणाम करण्यासाठी वाकलो आणि त्यांनी मला हृदयाशी धरलं!

खलनायक नाही… खरोखरच्या नायकाला भेटलो आज मी!

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*